सहिष्णू हिंदूंच्या धर्मभावनांची कदर न करून त्यांना आक्रमक बनण्यास भाग पाडणारे राज्यकर्ते !
`या दोन्ही हिंदुत्ववाद्यांनी या कृत्याची कबुली दिली आहे', अशी माहिती तपाससूत्रांनी अधिकृतरित्या पत्रकारांना दिली. अर्थात हे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यांच्या म्हणण्यात किती तथ्य आहे, त्याचे पुरावे काय याचा काथ्याकूट न्यायालयात होईल व यथावकाश सत्यही बाहेर येईल.
तूर्तास पोलिसांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवला, तर या हिंदुत्ववाद्यांनी केलेले कृत्य म्हणजे भरकटलेल्या व दिशाहीन हिंदुत्वाचा परिपाक म्हणायला हवा. असे निंद्य कृत्य करणे सुसंस्कृतपणात बसत नाही, हा प्राथमिक निष्कर्ष कोणीही मान्य करील, म्हणूनच त्याचा आम्ही निषेध करतो !
अटक झालेल्या हिंदुत्ववाद्यांनी `धार्मिक भावना दुखावल्यामुळे आपण हे कृत्य केले असे सांगून गुन्ह्याची कबुली दिली', असे पोलीस सांगतात. खरोखरंच असे बाँबस्फोट घडवून हिंदूंना स्वत:च्या धार्मिक भावना जपता येतील का, हा महत्त्वाचा प्रश्न या घटनेमुळे निर्माण झाला आहे. अटक झालेले हिंदुत्ववादी स्वत:ला `हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते' म्हणवतात, अशी माहिती पोलिसांनी दिली. समितीच्या स्थापनेपासून आम्ही या समितीचे कार्य जवळून पहात आहोत. समितीची शिकवण किंवा कार्यपद्धत यांत कोठेही गुन्हेगारी कृत्यांचे समर्थन, सर्वसामान्य जनतेला हानीकारक ठरणारी कृत्ये अशा गोष्टींना थारा असल्याचे आम्हाला आढळले नाही. जनप्रबोधन व धर्मशिक्षण ही समितीची द्विसूत्री आहे. म्हणूनच अनेक संतांचेही समितीला आशीर्वाद आहेत. बाँबस्फोटाच्या प्रकरणातील या दोन आरोपींची विचारसरणी समितीपेक्षा खूप भिन्न व विरोधाभास दर्शवणारी आहे. त्यामुळे बाँबस्फोटाच्या या कृत्याला ते स्वत:च अधिक जबाबदार आहेत.
हिंसक मार्ग नको, समाजाला धर्माचरणी बनवा !
हिंदु जनजागृती समितीमुळे देवतांचे विडंबन रोखण्यासाठी हजारो कार्यकर्ते सनदशीर मार्गाने देशभरात कार्य करत आहेत व त्यांना यशही येत आहे. गेल्या काही दशकापासून देवतांचे विडंबन सुरू असून ४-५ वर्षांच्या प्रबोधनाने ते बंद होईल, अशी आशा हिंदुत्वासाठी झटणार्यांनी बाळगू नये. संपूर्ण समाज धर्माचरणी होईल, त्याचवेळी हे गैरप्रकार थांबतील, असा बाँबस्फोट करून नाही. म्हणूनच हिंदुत्ववाद्यांनी स्वत:च्या धर्मरक्षणासाठी हिंसक मार्गाने न जाता, संपूर्ण समाज धर्माचरणी होण्यासाठी झटावे, हे अधिक चांगले होईल.
बाँबस्फोटातील आरोपींचा `सनातन प्रभात'शी संबंध नाही !
आज दिवसभर प्रसिद्ध होणार्या बाँबस्फोटाशी संबंधित बातम्यांतून आरोपी `सनातन प्रभात'चे कार्यकर्ते होते, असा उल्लेख वारंवार करण्यात येत होता. `सनातन प्रभात' हे एक वृत्तपत्र आहे व वृत्तपत्राचे कार्यकर्ते असू शकत नाहीत, हे न समजण्याएवढी प्रसारमाध्यमे अडाणी झाली, याचे आम्हाला दु:ख आहे. काही माध्यमांनी ही माहिती पोलीस सूत्रांचा हवाला देऊन सांगितली. बाँबस्फोटाच्या तपासाच्या निमित्ताने दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस आमचे देवद, पनवेल येथील कार्यालय, मुद्रणालय इतकेच नव्हे तर ठाणे, नवी मुंबई व मुंबई क्षेत्रातील सर्व वितरक अशा सर्वांपर्यंत पोहोचले. अटक झालेल्या आरोपींचा आमच्या वृत्तपत्राशी काहीही संबंध नसतांना ते आरोपींचा संबंध `सनातन प्रभात'शी जोडत असतील, तर हा प्रकार खरोखरंच गंभीर आहे.
देवतांचे विडंबन रोखण्यात आता राज्यकर्त्यांनीच पुढाकार घ्यावा !
आज अटक झालेल्या प्रभृतींचा मार्ग चुकला असला, तरी धर्मरक्षणाच्या बाबतीत त्यांच्या तीव्र भावनांची दखल राज्यकर्त्यांनी घ्यायलाच हवी. नाटकांतून होणारे विडंबन सरकारनेच रोखले असते, तर हा प्रकार घडला असता का, याचाही विचार सत्ताधार्यांनी करावा. `विविध माध्यमांतून होणारे देवतांचे विडंबन रोखण्यास राज्यकर्ते तत्पर नाहीत, तर आपणच काहीतरी करावे' या हतबलतेपोटी असे हिंसक प्रकार यापुढेही होणार नाहीत, याची हमी कोण देणार ? म्हणूनच देवतांचे विविध माध्यमांतून होणारे विडंबन रोखण्यासाठी स्वत:च पुढाकार घेण्याचा धडा राज्यकर्त्यांनी ठाणे बाँबस्फोट प्रकरणातून घेतला तर बरे होईल !
Discuss Tell a friendBury
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!
Comments