महाराष्ट्र पाठ्यपुस्तक मंडळाचे पुस्तक लागू !

पणजी, २६ जून (वार्ता.) - इयत्ता दहावीचे एन्.सी.ई.आर्.टी.चे इतिहास या विषयाचे अनेक चुका असलेले व इतिहासाचा विपर्यास करणारे पाठ्यपुस्तक मागे घेण्याचा निर्णय गोवा शिक्षण मंडळाच्या कार्यकारी समितीने घेतला आहे.

इंग्रजी व मराठी या दोन्ही माध्यमांचे इतिहासाचे पाठ्यपुस्तक मागे घेण्यात आले आहे. काल येथे झालेल्या पत्रकार परिषदेत गोवा शालांत मंडळाचे अध्यक्ष श्री. भास्कर नायक यांनी ही माहिती दिली. (गोवा शालांत मंडळाच्या अध्यक्षपदाचा ताबा घेतल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच पाठ्यपुस्तकांतील चुकांची दखल घेऊन योग्य निर्णय घेणारे अध्यक्ष श्री. भास्कर नायक यांचे अभिनंदन ! - संपादक) या पुस्तकाला पर्याय म्हणून महाराष्ट्र पाठ्यपुस्तक मंडळाचे इतिहासाचे पुस्तक लागू करण्यात येणार असून ते विद्यार्थ्यांना मोफत पुरवण्यात येईल. यांपैकी काही पुस्तके आज शाळांना वितरितही करण्यात आली आहेत, अशी माहिती गोवा शालांत मंडळाचे सचिव श्री. भगत यांनी आज सायंकाळी दिली. (हिंदूंनो, गोव्यातील हिंदु जनजागृती समितीच्या ध्वजाखाली येथील समस्त राष्ट्राभिमानी व धर्माभिमानी नागरिकांनी केलेल्या आंदोलनाला मिळालेल्या या यशाबद्दल ईश्‍वरचरणी कृतज्ञता व्यक्‍त करा ! - संपादक)
दहावीच्या इतिहास विषयाच्या पाठ्यपुस्तकातील इतिहासाचा विपर्यास, हिंदुद्रोह व भाषांतराच्या चुका यांबाबत प्रथम `दैनिक सनातन प्रभात'ने आवाज उठवला होता. `दैनिक सनातन प्रभात'ने सातत्याने याविषयी जनतेचे प्रबोधन केले होते. त्यानंतर जानेवारी २००८ मध्ये इयत्ता दहावीच्या पाठ्यपुस्तकात अक्षम्य चुका असल्याचे हिंदु जनजागृती समितीने गोवा शालांत मंडळाच्या नजरेस आणून दिले. या पाठ्यपुस्तकात हिंदूंच्या देवतांचे विडंबन, युरोपचा इतिहास, गांधींचा अवमान, अनेक ठिकाणी अनावश्यक क्रॉस असणे, सिगारेट ओढतांनाचे छायाचित्र, मुसलमानांचा उदोउदो करणारा चुकीचा इतिहास आदी अक्षम्य चुका होत्या. हे पुस्तक बदलण्याबाबत शालांत मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष एल्.एम्.टी. फर्नांडीस यांनी आडमुठी भूमिका घेतल्याने व सरकारनेही हा विषय गांभिर्याने न घेतल्याने समितीने विद्यार्थी, पालक, मराठीप्रेमी, इतिहासप्रेमी, धर्माभिमानी हिंदूंच्या सहभागाने राज्यव्यापी आंदोलन छेडले. गोवा शालांत मंडळाच्या तत्कालीन अध्यक्षांना संतप्‍त महिला पालकांनी बांगड्यांचा अहेरही दिला. राष्ट्रीय तंबाखू निवारण समितीनेही या पुस्तकातील सिगारेट ओढतांनाच्या छायाचित्राच्या मुद्यावर आक्षेप घेतला होता. गेल्या महिन्यात मराठी माध्यमाच्या पुस्तकातील भाषांतराच्या दुरुस्त्या करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर समितीने मुख्यमंत्री श्री. कामत यांची भेट घेऊन या पाठ्यपुस्तकातील इतिहासद्रोह व हिंदुद्रोह त्यांच्या नजरेस आणून दिला. या वेळी मुख्यमंत्री श्री. कामत यांनी इतिहास विषयाची दोन्ही माध्यमांची पुस्तके बदलणार असल्याचे आश्‍वासन समितीला दिले. त्यानंतर पुस्तकातील चुकांबाबत अभ्यासक्रम मंडळाला कळवण्यात येऊन त्याबाबत फेरविचार करण्यास सांगण्यात आले. त्यावर अभ्यासक्रम मंडळाने इतिहासाचे पुस्तक मागे घेऊन यंदाच्या वर्षी महाराष्ट्र पाठ्यपुस्तक मंडळाचे पुस्तक लागू करण्याची शिफारस केली. शालांत मंडळाच्या कार्यकारी समितीने ही शिफारस स्वीकारली व दोन्ही माध्यमांसाठी एन्.सी.ई.आर्.टी.चे पुस्तक मागे घेतले.

पुढील वर्षी एन्.सी.ई.आर्.टी.च्याच धर्तीवर; परंतु नवीन पुस्तक !
केपे सरकारी महाविद्यालयाचे डॉ. रेमी डायस यांच्या अध्यक्षतेखाली तज्ञांची एक समिती नेमण्यात आली असून ही समिती एन्.सी.ई.आर्.टी.च्या धर्तीवर इतिहासाचे नवे पुस्तक तयार करील. हे पुस्तक २००९-२०१० या वर्षापासून लागू करण्यात येईल, असे श्री. नायक यांनी सांगितले.

हिंदीचे पुस्तकही बदलले !
`स्पर्श-२' या हिंदी विषयाच्या पाठ्यपुस्तकाबद्दलही गेल्या काही दिवसांपासून घोळ सुरू होता. या पुस्तकातील अभ्यासक्रम कठीण असल्याच्या कारणावरून गेल्या वर्षी हे पुस्तक मागे घेण्यात आल्यानंतरही या वर्षी ते लागू करण्यात आले होते. ही चूक काही पालकांनी लक्षात आणून दिल्यावर हे पुस्तक बदलण्याचा निर्णय घेण्यात आला; परंतु असंख्य पालकांनी हे पुस्तक खरेदी केल्याने पुन्हा पालकांमध्ये रोष उत्पन्न झाला. या पुस्तकावरही कार्यकारी समितीने चर्चा केली. या पुस्तकातील धडे कठीण असल्याचे समितीने मान्य केले. त्यामुळे गेल्या वर्षीचेच पुस्तक यंदा चालू ठेवण्यात येणार असून ही पुस्तकेही आता विद्यार्थ्यांना मोफत देण्यात येतील. ही पुस्तके उद्यापासून वितरित करण्यात येतील.

`इतिहास व राज्यशास्त्र' या पाठ्यपुस्तकाच्या विरोधातील आंदोलनात सहभागी झालेल्यांचे हिंदु जनजागृती समितीतर्फे आभार !
दहावी इयत्तेसाठी लागू केलेल्या `इतिहास व राज्यशास्त्र' या पाठ्यपुस्तकाच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीने मार्च २००८ पासून पालक, शिक्षक, विद्यार्थी, हिंदुत्ववादी संघटना, हिंदुप्रेमी, शिक्षणप्रेमी व इतिहासप्रेमी यांच्या सहकार्याने सनदशीर मार्गाने राज्यव्यापी आंदोलन छेडले होते. या आंदोलनामध्ये प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या सहभाग घेऊन आंदोलन यशस्वी करणार्‍यांचे हिंदु जनजागृती समितीने आभार मानले आहेत. `इतिहास व राज्यशास्त्र' या पाठ्यपुस्तकाच्या विरोधातील लढ्यातील विजय हा जनतेचाच विजय आहे. सरकारने याची आधीच दखल घेतली असती, तर विद्यार्थ्यांना वेळेत पाठ्यपुस्तके उपलब्ध होण्यास मदत झाली असती. सरकारने यापुढेही जनतेच्या भावनांची दखल घ्यावी', अशी अपेक्षा समितीने व्यक्‍त केली आहे.
Discuss   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links