गेल्या पाच-सहा दिवसांतील बातम्या वाचून बहुतेकांच्या मनात एक प्रश्‍न आहे, तो म्हणजे समोर आयुष्याचा प्रचंड मोठा पट असताना, ज्यांना आयुष्य म्हणजे काय हेच उमगलेले नसते, अशा वयातील मुले आत्महत्या का करत आहेत? या प्रश्‍नाचे उत्तर व्यक्तिगणिक वेगळे आहे; पण ढोबळमानाने सांगायचे झाल्यास एकटेपणा, नाकारलेपणाची भावना, न्यूनगंड, हताशपणा आणि असहायतेची भावना ही कारणे देता येतील. आता आपल्यापुढे आव्हान आहे, ते या भावना दूर करण्याचे, मुळात निर्माणच होऊ न देण्याचे.

पाच जानेवारीचे वर्तमानपत्र उघडले आणि पहिल्याच पानावर असलेली ठळक बातमी वाचली. मनाला प्रचंड अस्वस्थता आली. त्यामध्ये तीन वेगवेगळ्या वयाच्या मुलांनी आत्महत्या केल्याची सविस्तर बातमी होती. त्यांचा परस्परांशी कोणताही संबंध नव्हता; पण त्यांची कृती एकसारखी होती. सात तारखेच्या वर्तमानपत्राने आणखी मोठा धक्का दिला; कारण अजून सहा मुलांनी आत्महत्या केल्याचे ते वृत्त होते. सर्वच संवेदनशील वाचकांना त्या बातमीने दुःखी केले, नव्हे प्रश्‍नांकितही केले आहे. हे असे का घडते, हा प्रश्‍न अनेकांच्या मनात आहे. यावरची अनेकांची मतेही वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झाली आहेत. अनेक मानसशास्त्रज्ञ असेही आहेत, की ज्यांचा "आत्महत्या' या विषयावर प्रदीर्घ अभ्यासही आहे.

नऊ मुलांनी केलेली कृती एकसारखी आहे म्हणजेच आत्महत्या आहेत. त्यांचे मार्ग थोडेफार भिन्न आहेत. कोणी विष घेतले आहे, कोणी गळफास, तर कोणी उंच इमारतीवरून उडी घेतली आहे; पण या एवढ्या उंच इमारतीवरून उडी घेतली आहे; पण या एवढ्या कोवळ्या वयाच्या मुलांच्या मनामध्ये आत्महत्या येते कुठून? ज्यांनी जीवनच पाहिलेले नाही, ज्यांनी कशाचाही उपभोग अद्यापपर्यंत घेतलेला नाही, आनंद ज्यांना अद्याप कशात असतो हेही माहिती नाही, त्यांनी आयुष्य का संपवावे?

ज्या तज्ज्ञांनी या मुलांच्या आत्महत्यांवर आपापली मते व्यक्त केली आहेत, ती सर्व आंशिकरीत्या बरोबर आहेत; मात्र सर्व समर्पक आहेत, असे मात्र म्हणता येणार नाही; कारण अभिजात अभ्यास आत्महत्यांविषयी आणखी काही सांगतात. प्रत्येक व्यक्तीची आत्महत्या वेगळ्याच दिशेने जाते व त्याचे कारणही स्वतंत्र असते, असे दिसून येते. अर्थातच, शास्त्रात त्याचे सामान्यीकरण करण्याचा प्रयत्न केलेला असतोच. काही तज्ज्ञांच्या मते आई-वडील, शिक्षक, स्पर्धा, अभ्यासाचे ओझे, परीक्षेतील अपयश या गोष्टींना खूप महत्त्व दिले जाते. यांपैकी कोणताही एक घटक आत्महत्येला १०० टक्के जबाबदार असतो किंवा १०० टक्के जबाबदार नसतो, असे नाही. हे सर्व घटक आपल्या जीवनाचे अविभाज्य घटक आहेतच. आपण सर्व जण या घटकांना सामोरे जातच आयुष्य आक्रमत असतो. मग काही व्यक्तीच आत्महत्या का करतात? काहींना जीवन घाईने संपविण्याची इच्छा का निर्माण होते? या प्रश्‍नांचा विचार मानसशास्त्राच्या अभ्यासकांना करावासा वाटतो.

सहकार्य आणि न्यूनगंड
ऍडलर या महान मानसशास्त्रज्ञाच्या मते बालवयातील चुका व परिपक्व व्यक्तीचे मोठ्या वयातील अपयश यांचा परस्परांशी थेट संबंध असतो. त्यांच्या मते जीवनात "सहकार्या'ची भावना बालवयातच शिकणे अत्यंत आवश्‍यक ठरते; कारण जी मुले हे सहकार्य शिकत नाहीत, अशी मुले सौम्य विकृती, व्यसनाधीनता अथवा गुन्हेगार बनण्याची शक्‍यता असते. हे टाळावे म्हणून शिक्षक-पालक यांनी मुलांना सहकार्य शिकविणे आवश्‍यक आहे. मुलांनी सहकार्य, धैर्य, स्वावलंबन अंगी बाणवणे जरुरीचे आहे.

व्यक्तीला अनेक समस्यांमधून मार्ग काढायचा असतो. त्या त्या वेळी समस्या न सुटल्यास व्यक्ती न्यूनगंडाने पछाडते. आत्महत्या करणाऱ्यांच्या मनात हा न्यूनगंड सलत असतो; कारण त्यांना अडचणी डोंगराएवढ्या दिसत असतात. सहकार्याने त्या सोडवू शकतो, याची कल्पनाच नसते व आपण काही करू शकणार नाही, आपण असहाय आहोत ही जाणीवच मनात घर करते.

भजनप्रीत कौर या पवई येथे राहणाऱ्या मुलीला न्यूनगंडाने पछाडले असावे; कारण तिचा भाऊ अत्यंत बुद्धिमान असून, इंग्लंडमध्ये मेडिसीनचा अभ्यास करतो आहे. परीक्षेतील अपयश व मनात असलेली उच्च यशाची अपेक्षा फोल ठरणे, ही आत्महत्येमागील मुख्य कारणे वाटतात. ऍडलरने सुचविल्याप्रमाणे या मुलीने केलेल्या आत्महत्येस मुख्यतः न्यूनगंडाची भावना जबाबदार आहे. तिला सहकार्य भावनेने स्वतःचे प्रश्‍न सोडविता आले असते; मात्र तशी मदत मागितली गेली नसावी, हे स्पष्ट होते.

असहायतेची भावना
कॅरेन हॉर्ने यांनी म्हटले आहे, की जो माणूस असहाय असतो तो मनाने खचतो. कोणाचेही प्रेम मिळण्यात तो अपयशी ठरलेला असतो. अशा व्यक्तीला वाटते माझी कोणालाच किंमत नाही, पर्वा नाही. मी जगून तरी काय करू? या व्यक्तीला खरे तर मायेची ऊब हवी असते. इतरांच्या जवळ जाऊनही अशी माया या व्यक्तींना मिळत नाही. इतरांकडून ही माणसे सतत नाकारली जात असतात. मेल्यावर तरी माझ्याविषयी सहानुभूती व्यक्त कराल, अशी मनीषा ठेवून अशी माणसे आत्महत्या करतात.

सुशांत पाटील या १३ वर्षे वयाच्या मुलाला परीक्षेत अपयश आले होते, तर नाशिक येथील गंगापूरमध्ये राहणारी धनश्री पाटील, वय वर्षे १९ ही अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत होती. तिने ओढणीने गळफास घेतला आहे. या दोन्ही मुलांना पोरकेपण आले असावे, असे बातमीवरून वाटते आणि कॅरेन हॉर्ने यांचे म्हणणे पटते. या मुलांना वेळीच मायेची ऊब, आपुलकी, समजावून घेण्यासाठी कोणी मिळाले असते, तर कदाचित त्यांनी आत्महत्या केल्याही नसत्या.

राग, बदल्याची भावना आणि हताशपणा
एडविन स्निडमन हा मानसशास्त्रज्ञ सांगतो, की व्यक्ती आत्यंतिक राग, बदल्याची भावना, हताशपणा, नाकारले जाण्याची भावना, अशा जीवनाच्या दृष्टीने नकारात्मक भावना बाळगतात. त्यांना सगळी नातीगोती तोडून टाकावीशी वाटतात आणि जगापासून आपण मुक्त व्हावे, असे वाटत असते. काही व्यक्तींमध्ये आपण "होपलेस' आहोत, जीवन निरर्थक आहे, अशी भावना बळावते, तर काहीचे स्वतःशीच भांडण सुरू असते.

सुमीत महेंद्र तळरेजा हा ठाण्यात राहणारा १७ वर्षे वयाचा मुलगा इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी घेतो व जीवन संपवितो. स्निडमनच्या स्पष्टीकरणाप्रमाणे आत्महत्या करणारा मुलगा आपले आयुष्य निरर्थक आहे अशी कल्पना करून घेतो. आई-वडिलांनाही कल्पना करता येणार नाही, असे विदारक सत्य समोर येते आहे. समाजातील एक सत्य असेही आहे, की स्त्रिया व लहान मुले यांच्यावर विलक्षण ताण असतात. आपले शील, चारित्र्य, अब्रू अशा अत्यंत नाजूक गोष्टीवर कुटुंबातून आघात होऊ लागले, की स्त्रीला आत्महत्येशिवाय मार्ग नसतो. अनेकदा इतिहासातील स्त्रियांच्या सामूहिक आत्महत्या याचीच उदाहरणे आहेत. जालियनवाला बागेतील "मौत का कुआ' आजही ओरडून हेच सांगतो.

संवादाचा अभाव
पौगंडावस्थेत मुले शारीरिकदृष्ट्या वाढताना मनाने कोवळीच असतात. अनेकदा पालकांच्या अपेक्षा पूर्ण न करता येणे, नाकारलेपणाची भावना, शरम, समलिंगी व्यक्तीकडून शोषण यातून सततचे दुःखदायक विचार मुलांच्या मनात येत असतात. अशा वेळी कुटुंबीय, मित्र, मित्रांचे पालक, आई यांच्याकडून मुलाला मदत मिळायला हवी असते. अशा मुलांना शिक्षकांनीही मोठा आधार देण्याची गरज असते. हे घडले तर हजारो आत्महत्या टळतील.

रवी दिलीप पवार हा २३ वर्षांचा तरुण आत्महत्या का करतो हेच कळत नाही. याचे महत्त्वाचे कारण त्याचा कोणाशीही संवाद नसतो. अशा मुलाला मदत मिळाली असती, तर त्याचा जीव वाचला असता.

...आत्महत्येच्या दिशेने
प्रत्येक आत्महत्येला एक "स्टोरी' असते. जेव्हा सुरवातीला व्यक्तीच्या जीवनात ताणकारक परिस्थिती निर्माण होते, तेव्हा स्व-पातळीवर ती हाताळण्याचा प्रयत्न व्यक्ती करत असते. जेव्हा याबाबत ती अयशस्वी ठरते, तेव्हा ती आत्महत्येकडे सरकू लागते. आत्महत्येच्या अनेक पद्धतींचा ती विचार करते. एका पद्धतीची मनोमन निवड करते व मग ती अमलात आणते. ही तयारी अनेक महिने किंवा वर्षे चालू असते. आत्महत्येच्या विचाराने त्याला बरे वाटत असते. पालकांना त्याच्याविषयी काळजी वाटत असते. अशा व्यक्ती बोलताना आत्महत्येची सूचकता दाखवितात. चिठ्ठ्याही लिहितात. काही संकेत देऊ लागतात; मात्र याचे असे विचार नेहमीचेच आहेत म्हणून मोठी माणसे दुर्लक्ष करतात आणि त्याला फटकारतात. असल्या वागण्याने इतर कोणी तुला जवळ करणार नाहीत, असे वारंवार बजावतात. आपणही कोरडेपणाने वागतात. मग अशी व्यक्ती दुखावते व आत्महत्या करते.

द्विधा मनःस्थिती
आत्महत्येच्या एका प्रकारामध्ये व्यक्ती द्विधा मनःस्थितीत असते. एकाच वेळी या व्यक्तींना जगावेसे आणि मरावेसेही वाटत असते. आपल्याला आत्महत्या करताना कोणीतरी पाहावे व परावृत्त करावे, अशी त्यांची इच्छा असते. आत्महत्येच्या अयशस्वी प्रयत्नातल्या व्यक्ती अशा मनोवृत्तीच्या असतात. आत्महत्येच्या एकाच प्रयत्नात इतरांनी त्यांना वाचविल्यास अशा व्यक्ती पुन्हा आत्महत्येकडे वळत नाहीत.

निराशा हे प्रबळ कारण
बहुतांश व्यक्तींमध्ये तीव्र स्वरूपातला हताशपणा किंवा निराशा आढळते व त्यामुळे अशा व्यक्ती आत्महत्या करतात. त्यांना आपल्या सर्व इच्छा-आकांक्षा मृत झाल्या आहेत, असे वाटते. आपण शारीरिक, मानसिक, भावनिकदृष्ट्या अगदी एकटे आहोत, असे वाटत राहते व आत्महत्येशिवाय आता दुसरे काही नाहीच ही भावना तीव्र बनू लागते. हा तीव्र हताशपणा किंवा निराशा असणे हे मानसिक विकृतीचे प्रभावी उदाहरण म्हणता येईल. अनेकदा या एकमेव कारणातून आत्महत्या होतात.

आत्महत्या धडा शिकविण्यासाठी
काही आत्महत्यांमागे मात्र वेगळेच कारण असते. माणसाचे मन विचित्र आहे. आपल्या परिवारातील व्यक्ती, आपले संबंधी यांना धडा शिकविण्यासाठी काही लोक आत्महत्या करताना दिसतात. वास्तविक, आपल्या आयुष्याचा अर्थच ज्यांना कळलेला नाही त्यांनी इतरांना धडा शिकविण्याचे काय कारण?
डॉ. मोहन आगाशे व डॉ. गीत यांच्या मते तीव्र निराशा, अपेक्षाभंग, दुःख, अपमान या भावनाही आत्महत्येला जबाबदार असतात. कोणत्याही व्यक्तीची आत्महत्या ही तिच्या जीवनात अतितीव्र भावनिक झंझावातच निर्माण करणारी असते हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

कोबलर व स्टॉटलॅंड म्हणतात, की आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या सभोवतालचा परिसर, व्यक्ती, मित्र, संबंधी यांची माहिती घेतल्याशिवाय नक्की कारण समजू शकत नाही, तर क. कशपवळप हे शास्त्रज्ञ म्हणतात, की आत्महत्या ही सांस्कृतिक पार्श्‍वभूमीवर तपासून घेतली पाहिजे.

हे तपासायलाच हवे
आज जीवघेण्या स्पर्धांविषयी खूप हाकाटी केली जात आहे; पण स्पर्धा कधी नव्हती? ती प्रत्येकाच्या जीवनात असतेच. इतर कोणाशी नसली, तरी स्वतःची स्वतःशीही असते. स्पर्धेला सुयोग्य पद्धतीने हाताळायला शिकविणे ही प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्तीची जबाबदारी आहे. आपण जे नाही आहोत ते सिद्ध करण्याची अहमहमिका का, असा प्रश्‍न प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे. प्रत्येक गोष्ट मग नृत्य, नाट्य, वाद्यवादन, वक्तृत्व, क्रीडा हे सगळे माझ्या मुलाला आले पाहिजे, या अपेक्षा सोडायला हव्यात. मुलाच्या मनावर, शरीरावर, बुद्धीवर, सामाजिकतेवर किती ताण निर्माण करायचा याचे भान पालकांनी ठेवले पाहिजे.

आपल्या मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. तो सर्वसामान्य आहे की वेगळा आहे? वेगळा असला तर त्याची दिशा नकारात्मक, की होकारात्मक हे पाहणे आवश्‍यक आहे. मुले आत्महत्या करीत आहेत याचे खापर कोणा एकाच्या माथी फोडता येणार नाही. याला व्यक्ती, परिस्थिती, समाज, संस्कृती हे सर्व घटक तेवढेच जबाबदार आहेत.

शेवटी मानसतज्ज्ञ म्हणून असे म्हणावेसे वाटते, की आपली मुले प्रेमाची, आपुलकीची, मायेची, स्नेहाची भुकेली असतात. त्यांना भरभरून देण्याच्या गोष्टीत आपण मागे आहोत. त्यांना माणुसकीच्या नात्याने जवळ करणे आवश्‍यक आहे. आज टीव्हीमुळे कुटुंबातल्या संवादाला तिलांजली मिळाली आहे. दोघांच्या मिळविण्याने मुले पोरकी झाली आहेत. एकेकट्या मुलामुळे ती सहवासाला मुकली आहेत. संस्कार शिकविण्यासाठी मुलांना संस्कार वर्गात पाठवावे लागते. आजी-आजोबांना वृद्धाश्रमात पाठवून आपण काय साधतो आहोत? कशातच शेअरिंग नसलेली मुले आई-वडिलांची सोय म्हणून मोबाईल घेऊन बसतात. ती पोनोग्राफी पाहण्यात नको तेवढा वेळ घालवीत आहेत. पालकांनी आज या सर्वांचा विचार करण्याची वेळ आली आहे.

आत्महत्या का घडतात व त्यापासून परावृत्त करण्यासाठी मला काय करता येईल याचा आज सुज्ञ नागरिकांनी स्वतःपुरता का होईना विचार करावा.

संसर्ग आत्महत्येचा
आत्महत्या या संसर्गजन्य असतात. विशेषतः नेणत्या वयातील मुलांबाबत ही शक्‍यता अधिक आढळते. त्यामुळे पाच तारखेच्या बातमीला दोन दिवस उलटण्यापूर्वी आणखी सहा मुलांनी आत्महत्या केल्याची बातमी आपल्याला वाचावी लागली.

---------------------------------------------------------------
प्रत्येकाची क्षमता वेगळी असते
काही विषय किंवा त्यातले काही मुद्दे मुलांना कळत नाहीत. प्रत्येक मुलाची शिकण्याची पद्धत, क्षमता वेगवेगळी असते. एका पद्धतीने शिकवलेले एकाला चांगले कळले, तरी दुसऱ्याला ते कळेलच असे नाही. हे गृहीत धरून असे विषय छोट्या गटांत शिकवायला हवेत. तिथे प्रत्येक मुलाकडे लक्ष देणे शक्‍य होते. त्याच्याशी बोलता येते. शिवाय आपल्याला नेमके काय कळत नाही, हे मुले छोट्या गटात असताना अधिक चांगल्या प्रकारे सांगू शकतात. आपल्याला समजेपर्यंत शिकू शकतात, समजून घेऊ शकतात. वर्गातला अर्ध्या तासाचा वेळ अनेक मुलांना एक विषय समजून घ्यायला पुरत नाही, तो वेळ इथे देता येतो.
---------------------------------------------------------------

"बरोबर' असावे, "वर' नको
आपण शिकण्याचा, सुधारण्याचा प्रयत्न करत असताना आणि एकूणच इतर वेळीही मोठ्या माणसांपैकी कोणीतरी आपल्याबरोबर असावे, असे मुलांना वाटत असते, ती त्यांची गरज असते. हे कोणीतरी अर्थात त्यांच्या "बरोबर' असावे लागते, त्यांच्या "वर' असणारे नको असते. शिक्षकांचा किंवा कोणत्याही मोठ्या माणसाचा उपदेश या वयात मुलांना नको असतो. मोठ्या माणसांच्या बोलण्यात उपदेशाचा वास आला, तरी मुले मिटून जातात. तुम्ही असे करा, असे म्हणण्यापेक्षा आपण असे करू या, असे म्हटलं तर मुलांना अधिक आवडते. बरोबर असणाऱ्याने काही शिकवावे, अशी मुलांची अपेक्षाच नसते. फक्‍त त्यांचे ऐकून घेणे, त्यावर त्यांच्याशी बोलणे, एवढेही त्यांच्यासाठी पुरेसे असते. मोठ्यांनी आपल्याशी संवाद साधणेच त्यांना महत्त्वाचे वाटत असते; कारण मोठी माणसे आपल्याबद्दल काय विचार करतात, याची त्यांना खूप उत्सुकता असते आणि ते त्यांना नेमके समजून घ्यायचे असते. आपण विचारलेले प्रश्‍न न टाळता त्यांना उत्तरे देणारेही कोणीतरी त्यांना हवे असते.
---------------------------------------------------------------

थोडं दुर्लक्षही करावं...
आपल्या सर्वच गोष्टींमध्ये मोठ्यांनी लुडबूड करू नये, असे मुलांना या वयात वाटत असते. हे थोडे कठीण आहे; पण त्यांच्या काही गोष्टींकडे दुर्लक्ष करता येणे, ही मोठ्यांची कसरत असते. आपण आता मोठे झालो आहोत, असे या वयातल्या मुलांना वाटत असते आणि त्यांच्या या वागण्याचा आदर करून मोठ्यांनी काही गोष्टी त्यांच्यावर सोडायला शिकले पाहिजे. मुले त्या उत्तम रीतीने हाताळतात.
---------------------------------------------------------------

आपण हे करू शकतो
- आपले निर्णय मुलांना विश्‍वासात घेऊन समजावून सांगावेत.
- आपल्या आर्थिक परिस्थितीची मुलांना पूर्ण कल्पना द्यावी.
- मुलांना पोकळ आश्‍वासने देऊ नयेत.
- आपल्याला मिळालं नाही ते मुलांना द्यावं याचा अट्टहास पालकांनी करू नये.
- मुलांचे अति लाड, अति कौतुक किंवा वारंवार अपमान करू नये.
- आपल्या स्वतःच्या दोन मुलांमध्ये तुलना करू नये.
- मुलांना आवड असल्यासच छंद वर्गांना पाठवावं. सक्ती करू नये.
- मुलांना किती गुण मिळाले यापेक्षा त्याला किती समजलं आहे ते लक्षात घ्यावं.
- चांगले मित्र असणं, ही जगण्यातील महत्त्वाची बाजू आहे.
- शिक्षणाबरोबर व्यायाम, आहार, झोप याबद्दलचं नियोजन करावं.
- फिरायला जाणं, गप्पा-गोष्टी, घरातली छोटी कामं यात मुलांना सामील करावं.
- मुलांना विनंती करावी, "ऑर्डर' करू नये.
- मुलांच्या वागण्यातले छोटे छोटे वर्तनबदल लक्षात घ्यावेत. त्यांना विश्‍वासात घ्यावं.
संबंधित बातम्या
चुकतंय कुठं?
सुशांतची आत्महत्याही "थ्री इडियट्‌स'च्या प्रभावातून?
प्रवास एका जिद्दीचा...
झेंडूची रसिका, फुले जमवुनी देतो तुझ्या ही करी (विडंबन)
वाशीम तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांची आत्महत्या
Discuss   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links