राजसाहेब..
गुणवंतांचा असा अपमान करू नका!
माननीय राजसाहेब,
बोर्डाच्या परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळविलेल्या पुण्यातील शेकडो मुला-मुलींना गेल्या आठवडय़ामध्ये सुखद धक्काच बसला. त्यांच्या घरचा दूरध्वनी खणखणला.. बोर्डाच्या परीक्षेत मिळविलेल्या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन. आमचे नेते राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते तुमचा खास


सत्कार आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी गणेश कला-क्रीडा रंगमंच येथे आवर्जून उपस्थित राहावे, अशी विनंती करणाऱ्या दूरध्वनीने सारेच हुरळून गेले. युवावर्गामध्ये आपली लोकप्रियता आधीच वाढलेली. त्यातच आता आपल्या हस्ते दहावी-बारावीच्या यशाचे बक्षीस मिळणार होते!
प्रत्यक्ष सत्काराच्या दिवशीची धांदल तर विचारूच नका. आई-बाबांनी खास सुटी घेतलेली. सारे कुटुंबच तय्यार होऊन आपल्याला सामोरे जाण्यासाठी सज्ज झाले होते. कोल्हापूर, मुंबई, सोलापूरहून आमचे आजी-आजोबा नि इतर नातलगही मोठय़ा उत्साहाने हा कौतुक सोहळा पाहण्यासाठी पुण्याला आले होते.
प्रत्यक्षात सोहळा सुरू झाला नि आपला करिष्मा अनुभविण्यास मिळाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करण्यात येत होता. मोठय़ा दिमाखात आपल्यासह व्यासपीठ सजले होते. आता आमचे नाव पुकारले जाणार नि आम्ही व्यासपीठावर येऊन आपल्या हस्ते सत्कार स्वीकारणार होतो. कॅमेऱ्याच्या बॅटऱ्या चेक करण्यात आल्या. काहींचे बाबा अजूनही ऑफिसमध्येच होते. त्यांना मोबाईल करून तातडीने बोलावून घेण्यात येत होते. कधी एकदा आमचे नाव पुकारले जाईल, याची उत्कंठा शिगेला पोचली होती.
प्रत्यक्षात मात्र झाला तो केवळ भ्रमनिरास नव्हे, तर घोर अपमान! आमच्या गुणवत्तेचा, वर्षभर आम्ही उपसलेल्या कष्टांचा आणि आमच्या कौतुकसोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित राहिलेल्या आप्तेष्टांच्या भावनांचा. एक तर आम्ही तुमच्याकडे सत्काराची मागणी करण्यासाठी आलो नव्हतो. आपल्या नावाने आम्हाला दूरध्वनी केले गेले होते. त्यामध्ये आवर्जून ‘राजसाहेबांच्या हस्ते सत्कार होणार आहे,’ असे सांगण्यात आले होते. त्यामुळेच त्या आश्वासनाची पूर्तता करणे हे संयोजकांचे कर्तव्यच होते. एखाद्या संस्थेच्या उद्घाटनप्रसंगी किंवा तिचे कार्य जनतेसमोर पोचविण्यासाठी एखादा कार्यक्रम आयोजित करणे काही गैर नाही. त्यासाठी दूरध्वनी करून माहिती देणेही प्रसंगी गैर नाही. तशा प्रकारचे मार्केटिंग हे सध्या केले जातेच. याची आम्हालाही कल्पना आहे. परंतु, जेव्हा खास आपले, खुद्द राजसाहेबांचे नाव घेऊन आमच्यासारख्या कोवळ्या विद्यार्थ्यांच्या भावविश्वाला हात घातला जातो, तेव्हा त्या आश्वासनाची पूर्तता करणे किती गरजेचे आहे, याची कल्पना तुमच्यासारख्या राजकारण्यांना काय येणार?
आपल्या हस्ते सत्काराचे स्वप्न भंगले होतेच. आता जी ट्रॉफी मिळणार होती, तीसुद्धा एखाद्या सेलमधील टी-शर्ट उचलावा अशा पद्धतीने दिली जात होती. चला फोटोसाठी स्टेजवर या, असे आवाहन करून जी काही मुले स्टेजवर चढली, त्यांचा फोटो काढण्यात आला. तुमच्या उद्दाम कार्यकर्त्यांनी वर आम्हाला सुनावलेही.. पाहा उद्या पेपरमध्ये हा फोटो कसा झळकेल!
राजसाहेब, आम्ही तुमच्याकडे मोठय़ा अपेक्षेने पाहात होतो. राजकारणाचा कोणताही अनुभव येण्यापूर्वीच त्यावरील विश्वास उडावा, अशी स्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्यासारख्या काही व्यक्तींच्या आधारावरच आम्ही राजकारणाविषयीची काही सकारात्मक पावले टाकण्याच्या, किमानपक्षी त्याबाबत सकारात्मक विचार करण्याच्या मन:स्थितीत होतो. परंतु, आता आपल्याच नावाने आमचा असा अपमान केला गेल्यानंतर आम्ही पूर्णत: हताश झालो आहोत.
माझे कित्येक मित्र-मैत्रिणी या अपमानदायी मनस्तापामुळे केवढे निराश झाले, याची तुम्हाला काय कल्पना येणार. मी काही सत्कार करीत नाही, असे एका वाक्यात स्पष्ट करून तुम्ही मोकळे झालात. पण, तुमच्या नावाने आम्हाला सत्काराची आशा दाखवली होती. कार्यक्रमासाठी गर्दी खेचण्याची ही किती क्रूर पद्धत! आम्ही काही भिकाऱ्यासारखे तुमच्या दारी आलो नव्हतो. दहावी-बारावीच्या परीक्षेत दाखविलेल्या गुणवत्तेच्या जोरावर तुमच्याकडूनच आम्हाला निमंत्रित करण्यात आले होते. निमंत्रितांशी असे वागण्याची तुमच्या पक्षाची रीत आहे काय?
छत्रपती शिवाजी महाराजांचे दाखले त्या वेळी दिले गेले. महाराजांनी जनतेच्या हितासाठी तिजोरी रिती केली. तुम्हाला तास-दीड तासाचा वेळ काढता आला नाही काय? प्रत्येक मुला-मुलींना एखाचा क्षणभरदेखील व्यासपीठावर बोलावून तुमच्या हस्ते ट्रॉफीही नव्हे, केवळ गुलाबपुष्प दिले असते, तरी तो एक क्षण आमच्यासाठी आयुष्यभराचा ठेवा ठरला असता. आमच्या काही मित्र-मैत्रिणींनी तुमच्याशी हस्तांदोलन केल्यानंतर तुम्हाला देण्यासाठी काही मनोगतही लिहून आणले होते. आता अशा अपमानानंतर शिव्यांची लाखोली वाहून ते मनोगत कचऱ्याच्या टोपलीत टाकले गेले. ते केवळ फाडलेले चार कागद नव्हते, तर आतापर्यंत तुमच्यावर जडलेला विश्वासही त्याचबरोबर होता!
आता कुणी म्हणेल, कार्यक्रम किती छान झाला, दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये फोटोसकट किती छान बातम्या आल्या. हजारोंच्या गर्दीमध्ये अशा डोकं फिरलेल्या चार-दोन व्यक्ती असतातच! पण, राजसाहेब, सत्कारापासून वंचित राहिलेल्या कित्येक मुला-मुलींच्या, त्यांच्या पालकांच्या मनामध्ये अशाच अपमानाचे शल्य खदखदत होते. त्याला वाट करून देण्याचे धाडस मात्र काही मोजक्यांनीच दाखवले. ‘तुमच्या घरी ट्रॉफी आणून दिली जाईल,’ असे आश्वासन देऊन माफीनामाही सादर करण्यात आला. खरंच, आम्हाला त्या ट्रॉफीमध्ये काहीच स्वारस्य नाही. तुमच्या हस्ते सत्काराची पर्वणी आम्हाला साधायची होती. दहावी-बारावीचे निकाल जाहीर झाले, की तुम्ही राजकारणी मंडळी आयत्या तव्यावर पोळी भाजून घेता. आमच्या यशाच्या भांडवलावर तुमचे फोटो छापून आणता. तुमच्या दातृत्वाचा प्रचार करता. मोठी आश्वासनेही दिली जातात. परंतु, पुन्हा पहिले पाढे पंचावन्न. आमच्या आयुष्याच्या वाटेतील समस्यांवर आम्हाला उत्तरे शोधावी लागतात. तुमचा हा शैक्षणिक कळवळा केवळ स्वार्थसिद्धीपुरताच मर्यादित असतो. म्हणूनच, निमित्त तुमचे. खरं तर सर्वच राजकारण्यांच्या या दिखाऊ वृत्तीचा या पत्राद्वारे समस्त विद्यार्थिवर्गाकडून निषेध! समाजातील असंतोष गप्प बसून मुकाटपणे सहन करू नये, असे तुम्हीच तर आम्हाला शिकविले आहे. अन्यायाच्या विरोधात आवाज उठविण्याची वृत्ती तुम्हीच आमच्यामध्ये बाणवली आहे. अन्य राजकारण्यांप्रमाणेच आपल्याला साधलेल्या संवादाचाही काहीच उपयोग होणार नाही, अशा निराशेची भावना बळावत चालली आहे. तरीही, परिणामांची तमा न बाळगता आपल्याशी हा संवाद साधला आहे.
कळावे,
एक गुणवंत विद्यार्थी




jai maharashtra
2 Comments   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links