शिवसेनेला अधिक कार्यक्षम बनवण्यासाठी शिवसेना भवनात शिवसेना हेल्पलाईन आणि कॉल सेंटरचं कार्यालय उभारण्यात आलंय. या कॉल सेंटरसाठी शैलेश पाटील यांनी खास ‘भगवं’ सॉफ्टवेअर बनवलंय.
कीर्तिकुमार शिंदे
फोटो : श्रीपाद नाईक




शिवसेना
चार अक्षरांनी बनलेला एक शब्द..
शिवसेना!
भल्याभल्यांची गाळण उडवणारा. कुणाला घाबरवणारा तर अनेकांना चीड आणणारा!
शिवसेनेला मात्र त्यामुळे फरक पडत नाही. जसं काही वर्षांपूर्वी ‘मार्क्‍सवादावर तुम्ही प्रेम करू शकता किंवा त्याचा द्वेष करू शकता; पण त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही’ असं म्हणायची आपल्याकडे एक पद्धत होती, तीच गोष्ट आज शिवसेनेबाबत लागू होते. यू जस्ट कॅन नॉट निग्लेक्ट शिवसेना!
कारणं काहीही असतील, पण शिवसेना काय चीज आहे, हे आजवर कुणीच छातीठोकपणे सांगू शकलेलं नाही. मुस्लिम लीगपासून भारतीय जनता पक्षापर्यंत आणि प्रजा समाजवादी पक्षापासून काँग्रेसपर्यंत अशा टोकाच्या वैचारिक भूमिका
असलेल्या पक्षांबरोबर कधी ना कधी युती केलेला हा पक्ष आहे. पण त्यामुळे कधी शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला नाही. उलट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरची त्यांची श्रद्धा आणि भक्ती वाढतच गेली. खरं तर आंधळी होत गेली असंही म्हणता येईल. काय कारण होतं याचं?
एकच उत्तर. शिवसैनिक!
आपला नेता म्हणेल ते प्रत्यक्षात आणण्यासाठी- मग मोरारजींची गाडी अडवणं असो वा मणिशंकर अय्यरला मुंबईतून हाकलून लावणं असो- शिवसैनिक सदैव तयार! बंद, ट्रेन रोखणं, बसगाडय़ा जाळणं, विरोधकांच्या ऑफिसांची तोडफोड नासधूस या तर नेहमीच्याच गोष्टी. बाळासाहेबांच्या तोडाफोडाच्या आक्रमक भाषणांनी शिवसैनिकांच्या या वृत्तीला खतपाणीच घातलं, हा इतिहास आहे.
पण उद्धव ठाकरे शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख झाल्यानंतर ही आक्रमकता राहणार नाही, असं अनेक जण उघड उघड म्हणू लागले होते. उद्धव ठाकरेंचा नेमस्त स्वभाव काही शिवसेनेला शोभणारा नाही असं ते तर्कशास्त्र होतं. पण झालंय ते उलटंच! नारायण राणे, राज ठाकरे यांच्यासारखे आक्रमक आणि पहिल्या फळीतले नेते शिवसेना सोडून गेल्यानंतरही शिवसैनिकांमधला आक्रमकपणा तसूभरही कमी झालेला नाही. गेल्याच महिन्यात मुंबईत झालेल्या रिलायन्सविरोधातल्या आंदोलनातही तीच आक्रमकता दिसली होती. या आंदोलनात ज्या बाईंचा डोळा फुटला त्यांना झालेल्या इजेचं काहीच दु:ख नाही. उलट शिवसेनेसाठी मी मरायलाही तयार आहे, असं सांगून त्यांनी आपली निष्ठा व्यक्त केली. बाळासाहेबांनी घडवलेला शिवसैनिक-केडर अजूनही शिवसेनेशी निष्ठावंत आहे, हे स्पष्ट करण्यास हे एकच उदाहरण पुरेसं आहे.
हा निष्ठावंत शिवसैनिक हीच आजवर शिवसेनेची ओळख होती. समस्या सोडवण्यासाठी त्यांनी निर्माण केली रस्त्यावरची संस्कृती- तोडफोड, मारझोड!
पण आता आणखी एका संस्कृतीने- कॉपरेरेट कल्चरने शिवसेनेत हळुवार प्रवेश केलाय. उद्धव ठाकरे यांच्या व्हाईट कॉलर स्वभावाशी सुसंगत अशी ही कॉपरेरेट संस्कृती. नव्यानेच सुरू झालेली शिवसेनेची हेल्पलाईन आणि कॉलसेंटर हे या संस्कृतीचं दृश्य स्वरूप. पण ते समजून घेण्यापूवी जोगेश्वरीच्या मलिक कुटुंबाचा अनुभव काय; ते पाहू..
महाकाली रोडवरील पूनम विहार सोसायटीत यश मलिक त्यांच्या यजमानांसोबत राहतात. ७५ वर्षांच्या मलिक यांना कॅन्सरने ग्रासलेलं आहे. त्यांचे यजमानही आजारीच असतात. त्यातच चार महिन्यांपासून त्यांच्या घरातल्या नळाला पाणी येणं बंद झालं. १५-१५ दिवस पाण्याचा एक थेंबही नळातून पडत नव्हता. मग मध्येच दोन-तीन दिवस पाणी यायचं. पुन्हा ये रे माझ्या मागल्या! शेजाऱ्यांकडून तरी किती वेळा पाणी मागणार? सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनीही त्यांचं म्हणणं कधी नीट ऐकून घेतलं नाही. अखेर त्या बाजूच्याच बिल्डिंगमध्ये असलेल्या त्यांच्या मुलीच्या घरी राहायला गेल्या. सोसायटीकडे दाद मागायला गेलेल्या त्यांच्या मुलाला सोसायटीच्या सेक्रेटरीने धक्काबुक्कीही केली. यामुळे चिडलेली मलिककन्या रुचिरा पुरी यांनी स्थानिक नगरसेवकाला गाठलं. नगरसेवकाने त्यांना पोलिसात तक्रार देण्यास सांगितलं. पण त्याचाही काही फायदा झाला नाही. अखेर, रुचिरा यांनी ०२२-२४२२२२२२ या क्रमांकावरून शिवसेना हेल्पलाईनशी संपर्क साधला आणि आपलं गाऱ्हाणं मांडलं. आणि काय आश्चर्य? संध्याकाळीच त्यांच्या घरात भावसार नावाचे स्थानिक शिवसैनिक हजर! त्यांनी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना योग्य ती समज दिली आणि दुसऱ्या दिवसापासूनच मलिक यांच्या घराला नियमित पाणी मिळतंय. त्यासाठी सोसायटीने खास टँकरची सोय केली आहे!
हा अनुभव सांगताना रुचिरा पुरी अगदी भरभरून बोलत होत्या. त्यांच्या आईला मदत करण्यात त्या यशस्वी झाल्या होत्या, शिवसेनेच्या हेल्पलाईनमुळे!
त्या म्हणाल्या, ‘‘मी शिवसैनिक नाही. शिवसेना म्हणजे दादागिरी असा माझा समज होता. पण या चांगल्या अनुभवानंतर शिवसेनेबद्दलचं माझं मत पूर्ण बदललंय.’’
संकटाच्या वेळी आमच्या मदतीला शिवसेनाच धावून आल्यामुळे यापुढे ‘आय वील बी लॉयल टू शिवसेना’, असं सांगायलाही त्या विसरल्या नाहीत.
असाच एक अनुभव आहे गिरगावातल्या नीलेश देसाईंचा. ठाकूरद्वार इथल्या भाटिया निवासमध्ये देसाई राहतात. सर्व रहिवासी गुजराती-मारवाडी. इमारतीच्या गेटवरच तिथला एका भंगारवाला जुनं सामान मांडायचा. रहिवाशांना त्यामुळे येण्याजाण्यास अडथळा व्हायचा. अनेकदा सांगूनही तो जुमानत नव्हता. पोलिसांकडे तक्रार केल्यानंतरही काही फायदा झाला नाही. अखेर देसाईंनी शिवसेना हेल्पलाइनला फोन केला. त्यानंतर ४८ तासांच्या आत भंगारवाल्याने आपली चूक कबूल केली आणि सामान उचललं. भाटिया निवासमधले सगळे रहिवाशी खूष आहेत आणि देसाई म्हणतात, ‘यंदा आमचं मत शिवसेनेलाच!’
ही आहे सीईओ उद्धव ठाकरेंची कॉपरेरेट शिवसेना आणि तिचं हेडक्वार्टर आहे पोस्टमॉडर्न शिवसेना भवन! शिवसेना भवनच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यांच्या मध्ये वसलेल्या शिवसेना कॉलसेंटरमधनं ती ऑपरेट होतेय.. या सिस्टीमचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत शिवसेनेच्या आयटी आणि मीडिया विभागाचे प्रमुख शैलेश पाटील. पक्षाची ही कॉपरेरेट पद्धती, तिची आवश्यकता तसंच तिच्या कार्यपद्धतीविषयी पाटील यांनी लोकप्रभाला अत्यंत सविस्तर माहिती दिली.
एखाद्या व्यक्तीला त्याच्या कामासाठी शिवसेनेला संपर्क साधायचा असेल तर त्याने नक्की कुणाला संपर्क साधायचा; नेमकं कुणाशी बोलायचं; या गरजेतून शिवसेना कॉलसेंटर या संकल्पनेचा जन्म झाला, असं पाटील यांनी सांगितलं. ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवायला मार्च २००८ मध्ये उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आयटी आणि मीडिया विभाग स्थापन केला. सुरुवातीला माहितीचं संकलन आणि तिची उपलब्धता ह्या गोष्टींवर या विभागाने लक्ष केंद्रित केलं. त्यासाठी शिवसेना भवनातच या विभागाचं ऑफिस थाटण्यात आलं. त्यांना कॉम्प्युटर, सव्‍‌र्हर अशा सगळ्या गोष्टी उपलब्ध करून देण्यात आल्या. अत्याधुनिक सॉफ्टवेअर्स आणि नवीन सिस्टीम्स डिझाईन करण्यात आल्या. शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची यादी- गटप्रमुख, शाखाप्रमुखाांपासून ते शिवसेना नेत्यांपर्यंत- तसंच त्यांनी कुणाला रिपोर्ट करणं अपेक्षित आहे, याचा नीट अभ्यास करण्यात आला. आणि तयार झालं एक भगवं सॉफ्टवेअर!
तीन महिन्यांपूर्वी शिवसेना कॉलसेंटरचं उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झालं. अगदी एखाद्या कॉपरेरेट कॉलसेंटरसारखंच वातावरण त्यामुळे शिवसेना भवनातल्या या कार्यालयात पाहायला मिळतं. १८ ते २५ वयोगटातले २२ तरुण-तरुणी ब्लॅक टीशर्ट आणि जीन्स या वेषात इथे सकाळी ९ पासून रात्री ८ वाजेपर्यंत काम करतात.
हेल्पलाईनच्या ०२२-२४२२२२२२ या क्रमांकावरून कुणीही फोन केला की आधी ऐकायला मिळतं ते ‘जय महाराष्ट्र. शिवसेना भवन.’ मग त्याची तक्रार ऐकून घेतली जाते. ती पालिकेशी संबंधित आहे, की मंत्रालयाशी अशा पद्धतीने तिचं वर्गीकरण केलं जातं. हेल्पलाईनची मोडस ऑपरंडी स्पष्ट करताना शैलेश पाटील म्हणाले, ‘तक्रारदाराने त्याची तक्रार सांगितल्यानंतर त्या भागातील शिवसेना पदाधिकाऱ्यांना त्याची तक्रार एसएमएसद्वारे कळवण्यात येते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शिवसेना पदाधिकाऱ्याला फोन करून त्याने काही कारवाई केली का, याबाबत कॉलसेंटरमधून विचारणा केली जाते. त्याने काम केलेलं नसेल तर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशीही फोनद्वारे विचारणा केली जाते. तीन दिवसांत पदाधिकाऱ्याने काहीच कारवाई केलेली नसेल, तर ही गोष्ट उद्धव ठाकरेंच्या कानावर घातली जाते.’
पण आतापर्यंत तशी वेळच न आल्याचंही त्यांनी सांगितलं. कॉलसेंटरमधून फोन गेल्यावर शिवसैनिक तात्काळ कामाला लागतात, असाच आमचा अनुभव आहे. शिवाय, आम्ही तक्रारदार आणि शिवसेना पदाधिकारी या दोघांशीही सतत संपर्कात राहून फॉलोअप घेत असतो, असंही पाटील यांनी सांगितले.
नागरिकांच्या समस्या सोडवण्यात कॉलसेंटरला यश मिळत असलं तरी त्यामुळे सेनेतच सगळं आलबेल आहे, असं मात्र समजण्याची आवश्यकता नाही. कॉलसेंटरची ही कॉपरेरेट संस्कृती टिळा लावणाऱ्या आणि दाढी राखणाऱ्या टिपिकल शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मात्र अंगवळणी पडलेली नाही. कुणीतरी आम्हाला फोन करणार आणि मग आम्ही त्याप्रमाणे काम करायचं, हे त्यांना पटत नसावं. त्यामुळेच असेल कदाचित, पण शिवसेनेतच या कॉलसेंटरला किंवा त्याच्या संचालकांना शिव्या घालणारे बरेच जण भेटतात. शैलेश पाटील यांनाही त्याची जाणीव आहे. ते म्हणाले, ‘कुठल्याही राजकीय पक्षात कॉपरेरेट कल्चर रुजवणं कठीणच आहे. शिवसेना त्याला अपवाद कसा असेल? पण आम्ही हे जे काही प्रयत्न करतोय ते लोकांच्या भल्यासाठीच आहेत. त्यामुळे कुणी नावं ठेवली तरी त्याकडे लक्ष द्यावंसं वाटत नाही.’
फक्त हेल्पलाईन आणि कॉलसेंटर निर्माण करून शिवसेना थांबलेली नाही. भारतीय कामगार सेना, भारतीय विद्यार्थी सेना या सेनेच्या संघटनांनाही अत्याधुनिक बनवण्याचं काम सुरू आहे. वेबसाईट, एसएमएस पूल यांच्या माध्यमातून त्यांनाही इलेक्ट्रॉनिक एजमध्ये नेण्यात आलंय. लवकरच मुंबईतील कॉपरेरेट कंपन्यांना शिवसेनेशी अधिकृत संपर्क साधता यावा, यासाठीही एक सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यात येत असल्याची माहिती पाटील यांनी दिली. या कंपन्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी तसंच मराठी तरुणांना नोकरी मिळवण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकेल. एवढय़ा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणारा शिवसेना आज देशातील एकमेव पक्ष आहे, असा दावाही पाटील यांनी केला.
शिवसेनेचा ढाण्या वाघ आता फक्त कागदी वाघ बनल्याची टीका गेल्या अनेक दिवसांपासून केली जात होती. पण शिवसेना भवनमधलं ह्या पेपरलेस कॉलसेंटरचं काम बघितल्यानंतर हा अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक वाघ भल्याभल्यांना घाम फोडल्याशिवाय राहणार नाही, याबाबत खात्री वाटते.
बदलते शिवसेना भवन!
नव्या शिवसेना भवनात प्रवेश करताना आता प्रत्येकाला सुरक्षा रक्षकांच्या तपासणीनंतर तळमजल्यावरील ऑपरेटरकडे आपलं नाव, मोबाईल क्रमांक, कुणाला भेटायचंय त्याचं नाव सांगावं लागतं. आपण देत असलेली ही माहिती सांगून होते न होते तोच हातातल्या मोबाइलवर ’वेलकम टू शिवसेना भवन’ हा मेसेज आलेला असतो. या इलेक्ट्रॉनिक स्वागतामुळे सुखद धक्का बसतो.
व्हिडिओ सव्‍‌र्हिलन्स सिस्टीम : गेल्या वर्षी मुंबईतल्या ताज हॉटेलवर झालेल्या अतिरेक्यांच्या हल्ल्यानंतर शिवसेना भवनातील सुरक्षा व्यवस्था अधिकच कडक करण्यात आली. संपूर्ण शिवसेना भवनात एकूण ३२ व्हिडिओ कॅमेरे लावून आतील तसेच बाहेरच्या स्थितीवर बारीक लक्ष ठेवण्यात येते. ही व्यवस्था राबवण्यासाठी नॅशनल सिक्युरिटी गार्डमधल्या अनुभवी लोकांची मदत घेण्यात येतेय.
फेजिंग सिस्टीम : शिवसेना भवनात कोणताही अपघात घडल्यास किंवा आणीबाणीची स्थिती उद्भवल्यास कंट्रोल रूममधून माइकद्वारे इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर/ रुममध्ये सूचना देता येऊ शकते.
ऑटोमेटेड इलेक्ट्रॉनिक अ‍ॅक्सेस कंट्रोल : शिवसेना भवनावर अतिरेक्यांनी हल्ला केला किंवा काही धोका निर्माण झाला तर जिथे प्रमुख नेत्यांच्या बैठका होतात त्या रूमचे दरवाजे कंट्रोल रुममधलं एक बटन दाबताच बंद होणार. रूमच्या दरवाजाबाहेरील इलेक्ट्रॉनिक शटरने त्या केबीन तात्काळ बंद होणार.

उद्धव ठाकरे यांचा भगवा आयफोन!
उद्धव ठाकरे आयफोन थ्रीजीएस हा अत्याधुनिक, सर्वात वेगवान तसंच कार्यक्षम आयफोन वापरतात. त्याला त्यांनी नाव दिलंय भगवा आयफोन! (रंगाने मात्र हा आयफोन सफेद आहे) या आयफोनमुळे उद्धव ठाकरे जगात कुठेही असले तरी शिवसेना पदाधिकाऱ्यांशी कायम संपर्कात राहू शकतात, अपडेट राहू शकतात. मुळात अ‍ॅप्पल या जगद्विख्यात कंपनीने बनवलेल्या आयफोनमध्ये शेकडो फंक्शन्स आहेत. पण खास उद्धव ठाकरे यांच्या सोयीच्या दृष्टीने त्यात बरीच मॉडिफिकेशन्स करण्यात आली आहेत. शिवसेनेचं एक नवं कोरं सॉफ्टवेअरच त्यात इन्स्टॉल करण्यात आलंय. त्यामुळे आयफोनच्या आयकॉन्समध्ये काही भगव्या आयकॉन्सची भर पडली आहे.
फॅक्स : शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पाठवलेला फॅक्स उद्धव यांना थेट त्यांच्या आयफोनवरच मिळतो. उद्धव यांच्याशिवाय हा फॅक्स दुसरी कोणतीही व्यक्ती वाचू शकत नाही, त्यामुळे फॅक्समधील विषय गोपनीय राहतो.
एसएमएस : शिवसेना हेल्पलाईनला पाठवलेला प्रत्येक एसएमएस उद्धव त्यांच्या आयफोनवर वाचू शकतात.
एसएमएस ब्लास्ट : उद्धव ठाकरे एकाच वेळी सुमारे साडेतीन लाख लोकांना (३२० शब्दांचा) एसएमएस पाठवू शकतात. आणीबाणीच्या वेळी किंवा एखाद्या निर्णायक क्षणी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरू शकते.
इलेक्ट्रॉनिक सव्‍‌र्हेलन्स ऑन सेलफोन : शिवसेना भवनात कोण कोण आलंय; बैठकीत ते काय करताहेत; या गोष्टी उद्धव ठाकरे त्यांच्या आयफोनवर लाइव्ह बघू शकतात. इतकंच नव्हे तर शिवसेना भवनबाहेरच्या चौकात काय स्थिती आहे; यावरही ते थेट लक्ष ठेवू शकतात.
कॉन्टॅक्ट लिस्ट : शिवसेना कॉलसेंटरमध्ये नोंद झालेला प्रत्येक संपर्क क्रमांक (सुमारे ३ लाख क्रमांक) उद्धव यांना त्यांच्या आयफोनवर उपलब्ध. यामुळे अतिमहत्वाच्या व्यक्ती, शिवसेना पदाधिकारी किंवा अगदी एखाद्या सर्वसामान्य माणसाशीही ते थेट बोलू शकतात. एखाद्या व्यक्तीचा संपर्क क्रमांक बदलला आणि या बदललेल्या क्रमांकाची नोंद कॉलसेंटरमध्ये झालेली असेल तर उद्धव यांच्या आयफोनवर त्या व्यक्तीचा क्रमांक आपोआपच बदलला जातो!
शिवसेना डेली : राज्यभरात शिवसेनेचं काय चाललंय; कुठे कोणतं आंदोलन/बैठक सुरू आहे; याविषयीची इत्यंभूत माहिती उद्धव यांना त्यांच्या आयफोनच्या शिवसेना डेली या आयकॉनवर क्लिक करताच मिळते.
महाराष्ट्राचा नकाशा : राज्याचा संपूर्ण नकाशा, वाहतुकीचे मार्ग याची संपूर्ण सचित्र माहिती उपलब्ध.
व्हॉईस मेल सिस्टीम : शिवसेनेच्या एखाद्या पदाधिकाऱ्याला उद्धव ठाकरेंशी थेट बोलायचं असेल, पण वेळेअभावी ते शक्य नसेल तर तो पदाधिकारी त्याचा निरोप उद्धव यांच्यासाठी व्हॉइस मेलच्या रुपात ठेवू शकतो. त्यानंतर त्याच्या निरोपाला उद्धव ठाकरेंचे प्रतिसादात्मक उत्तरही व्हॉईस मेलच्याच रूपात पाठवले जाणार.

०२२-२४२२ २२२२
शिवसेना हेल्पलाइन
मुंबईसह महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील, शहरातील वा गावातील कुणाही व्यक्तीला, मग ती शिवसैनिक असो वा नसो, शिवसेनेशी संपर्क साधायचा असेल किंवा शिवसेनेकडून कोणत्याही प्रकारची मदत त्या व्यक्तीला हवी असेल तर शिवसेना हेल्पलाईन सज्ज आहे. त्यासाठीचा क्रमांक आहे ०२२-२४२२ २२२२. याशिवाय, बीएसएनएल व एमटीएनएल फोनवरून १८००-२२२-७७२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधता येऊ शकतो.
तसंच, shivsena--message असे टाइप करून कुणीही आपली तक्रार ५६०७० या क्रमांकावर एसएमएस केल्यास त्याचीही तात्काळ दखल घेतली जाते.

bmc@shivsena.org
ऑनलाईन ‘शिव’पालिका!
मुंबई शहर स्वच्छ ठेवण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली आहे. सर्वसामान्य मुंबईकर आणि महापालिका प्रशासन यांमधला दुवा बनण्यासाठी शिवसेनेने एक अनोखा ऑनलाईन उपक्रम सुरू केलाय. या अंतर्गत कोणाही व्यक्तीने जर एखाद्या अस्वच्छ जागेचा फोटो काढून मेल केला तर ती जागा तात्काळ स्वच्छ करण्यासाठी प्रयत्न केले जातात. याशिवाय, पालिकेच्या कामकाजाशी संबंधित काही तक्रारी असतील तर त्यांचीही दखल घेतली जाते.

www.shivsena.org
ऑनलाईन शिवसेना!
शिवसेनेची ६६६.२ँ्र५२ील्लं.१ॠ ही अधिकृत वेबसाईट. या वेबसाईटवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब तसंच उद्धव ठाकरे यांची भाषणे, फोटो, लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने बनवलेल्या व्हिडीओ जाहिराती, तसंच उद्धव ठाकरे यांची फोटोग्राफी ,अकरावी ऑनलाईन अ‍ॅडमिशन हेल्प सेंटर अशा अनेक सेवा एका क्लिकवर उपलब्ध आहेत.
1 Comment   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links