सुझलॉनचे वारे सरकले कच्छला!
2 Nov 2009, 0127 hrs IST
सुझलॉन एनजीर् प्रा. लि.या पवनऊर्जा निर्मिती क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीने ७५० मेगावॉट वीज निर्मितीच्या विस्तारीत प्रकल्पासाठी धुळे जिल्ह्याऐवजी गुजरातमधील कच्छ परिसरातील जाखाऊ डोंगररांगांची निवड केल्यामुळे जिल्ह्यातील उद्योगप्रेमींना धक्का बसला आहे.
सुझलॉन कंपनीचे धुळे व नंदूरबार जिल्ह्यात २५० मेगावॉट क्षमतेचे पवनऊर्जा निर्मितीचे प्रकल्प आहेत. १५०० मेगावॉट वीज निर्मिती करण्याची क्षमता असलेले वेगवान वारे जिल्ह्यातील निजामपूर परिसरातील डोंगररांगांवरून वाहतात. असा निष्कर्ष या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सवेर्क्षणानंतर नोंदविला आहे. त्यामुळे सुझलॉन, मायकॉन आणि वेस्टा या पवनऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांचे लक्ष या परिसराकडे वेधले गेले. सध्या एकट्या सुझलॉनच्या ताब्यात धुळे व नंदूरबार जिल्ह्यातील पाच हजार एकर जागा आहे. त्यावर ५४८ पंख्यांच्या माध्यमातून २५० मेगावॉट वीज निर्मिती सुरू आहे. उर्वरित जागेवर ५०० पंखे उभारून विस्तारीकरणाची योजना अमलात येणार होती. मात्र सुझलॉन समूहाने कच्छ परिसरात विस्तारीकरणाची योजना अमलात आणण्याचे जाहीर केले. सुझलॉनचे संचालक हरीश मेहता यांनीच याबाबत माहिती दिली आहे.
गुजरात सरकारने शंभर टक्के सबसिडी देऊ करत दिलेल्या भरीव सवलतींना प्रतिसाद देत सुझलॉनने कच्छमध्ये विस्तारीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. सुझलॉनप्रमाणेच विंड पॉवर एनजीर् प्रा.लि. या कंपनीनेही १०० मेगावॉट पवन ऊर्जा निर्मितीचा ६५० कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी गुजरातमधील जामनगरजवळील सुरजबरी परिसरात ३०० एकर जागा विकसित करण्याचे काम सुरू केले आहे.
सुझलॉनचे सध्या राज्यात सातारा आणि धुळे जिल्ह्यात तसेच तामिळनाडूमध्ये ७५० मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प कार्यान्वित आहेत. विस्तारीकरणाच्या योजनेत ही क्षमता दुप्पट होणार आहे. एकट्या गुजरातमध्ये ७५० मेगा वॅट क्षमतेचे प्रकल्प येत्या दोन वर्षात सुरू झालेले असतील. धुळे-नंदूरबार जिल्ह्यातील या पवन ऊर्जा प्रकल्पांमुळे मोठ्या प्रमाणावर प्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध झालेल्या नाहीत. मात्र अप्रत्यक्ष रोजगार मिळाल्यामुळे निजामपूर, दोंडाईचा, साक्री, नंदूरबार येथील बाजारपेठांना झळाळी आली आहे. विस्तारीकरणाची योजना अमलात आली तर या परिसराचे मागासलेपणाचे पर्व संपुष्टात येईल, या आशेवर बसलेल्यांना मात्र सुझलॉनच्या बदलत्या वाऱ्यांमुळे निराश व्हावे लागणार आहे. जिल्ह्यातील नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींना यासंदर्भात पाठपुरावा करावा आणि सुझलॉनच्या विस्तारीकरणाचे वारे खानदेशच्याभूमीकडे वळवावेत अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
Discuss Tell a friendBury
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!
Comments