स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर
("झाले बहु, होतील बहु, परंतु या सम हा")
‘ने मजसी ने परत मातृभूमीला’....
घर मोडकळीला आल्याचा – दोघं भाऊ पकडले गेल्याचा – धक्का होताच. घरावर राष्ट्राच्या नावाने बेल तुळस वाहून हे लोक बाहेर पडले तरी प्रेम जिवंतच असतं ही माणसं सामान्य नव्हती. एवढया मोठया सत्तेशी ते थोडेच लोक झुंज घेत होते. अख्खा समाज तुमच्या बाजूने असला तरी तो तुमच्या बाजूने उभा राहत नाही. त्याला उभं करायचं आणि त्याचवेळेला एकाकी झुंजायचं असं अवघड काम ते करीत होते. कुटुंबाची वाताहत, कार्य उदध्वस्त होण्याची वेळ येऊन ठेपणं आणि स्वतः शंभर टक्के पकडले जाणार आहोत हे कळणं यातून अक्षरशः पळून जाऊन ते त्या ब्रायटनच्या किना-यावर बसले होते. पकडलो गेलो तर परत भारतात पाठवतीलच असं सांगता येत नाही हा अत्यंत अस्वस्थ करणारा विचार आणि समोर सागर. तो मध्ये आहे म्हणून जाऊ शकत नाही. या भावनेतून ते शब्द आले – ‘ने मजसी ने परत मातृभूमीला’ जणू काही ते त्यांचा सगळा भावनिक आघात सागरावर करीत आहेत – त्या सागरावर रागावलेला – रूसलेला हा मातृभूमीचा प्रियपुत्र म्हणतो – ‘सागरा, तू खरं तर माझा भूमातेचे पाय धुणारा सेवक आहेस.
भूमातेच्या चरणतला तुज धूता ।
मी नित्य पाहिला होता
त्यावेळेला मी तिथे असताना तू मला मैत्रीने म्हणालास – मित्र मित्राला म्हणतो तसा – की चल जरा फिरायला जाऊ
दुस-या देशात-
मज वदलासी अन्य देशी चल जाऊ ।
सृष्टीची विविधता पाहू
त्याच वेळेला माझ्या आईच्या ह्रदयात माझा तिला विरह होईल की काय अशी शंका आली.
तअ जननी-ह्रद विरहशंकितहि झाले ।
परि तुवां वचन तिज दिधले
पण तू तिला वचन दिलंस, की मी मार्गज्ञ म्हणजे वाट माहित असणारा आहे, आणि मी याला अगदी पाठीवरून घेऊन जाईन – जहाज सागराच्या पृष्ठावरून म्हणजे पाठीवरूनच नेलं जातं. त्यानुसार
मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठि वाहीन।
त्वरित या परत आणीन
विश्वसलो या तव वचनी । मी
जगदनुभव-योगे बनुनी । मी
तुझ्या वचनावर विश्वास ठेवला. तू जगभर सगळीकडे आहेस त्यामुळे जगाचा तुला अनुभव असाणार हा विश्वास आणि मलाही जगाचा सुंदर अनुभव यावा ही इच्छा या दोन्हीच्या योगे मी ‘बनलो’ तयार झालो आणि ‘बनलो’ म्हणजे फसलो.
तव अधिक शक्त उदधरणी । मी
पाणी कोणत्याही वस्तुला उत् म्हणजे वर धारण करतं वर ढकलंत त्याला उदधरण (buoyancy) म्हणतात. त्यामुळे वस्तूचं वजन पाण्यात कमी वाटतं. हा उदधरण. शक्तिचा शास्त्रीय अर्थ आणि ‘उद् धार करणे’ याचा प्रचलित अर्थ दोन्हींनी – तुझ्या उद् धरण शक्तीवर जास्त विश्वासलो. इथं अडकवून चांगला उद् धार केलास बरं !
‘येईन त्वरे’ कथुन सोडिले तिजला ।
सागरा प्राण तळमळला ।।१।।
लवकर येईन असं सांगून तिला सोडलं. (भारताचा किनारा सोडला) पण आता ते जमेल की नाही कुणास ठाऊक म्हणून प्राण तळमळतो आहे.
शुक पंजरि वा हरिण शिरावा पाशी ।
ही फसगत झाली तैशी
पोपट पिंज-यात किंवा हरिण पारध्याच्या पाशात सापडावा तसा फसलो.
भू विरह कसा सतत साहू या पुढती ।
दशदिशा तमोमय होती
तमोमय म्हणजे अंधःकारमय – मार्ग दिसत नाही असं झालंय.
गुणसुमने मी वेचियली या भावे ।
की तिने सुगंधा घ्यावे
जरि उद् धरणी व्यय न तिच्या हो साचा ।
हा व्यर्थ भार विद्येचा
मला काय आठवतं ? तर माझ्या देशातल्या आम्रवृक्षांची वत्सलता, त्या फुललेल्या सुदंर वेली आणि तिथला छोटा पण सुगंधी गुलाब. (इकडच्या मोठया गुलाबांना तो सुगंध नाही आणि इकडच्या माणसांना आमच्या कुटुंबातल्या माणसांप्रमाणे घरात ती आम्रवृक्षासारखी वत्सलता ही नाही. त्यांच्यावर पुढची पिढी नवलतांसारखी वाढते आणि तिच्या पुढच्या पिढीची फुलंही त्या वृक्षवेलींवर नांदतात. ही सुंदर कुटुंब वत्सलता – प्रेम इथे नाही.
ती आम्रवृक्षवत्सलता । रे
नवकुसुमयुता त्या सुलता । रे
तो बाल गुलाबही आता । रे
फुलबाग मला हाय पारखा झाला ।
सागरा प्राण तळमळला ।। २ ।।
नभि नक्षत्रें बहुत एक परि प्यारा ।
मज भरतभूमिचा तारा
प्रासाद इथे भव्य परी मज भारी ।
आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य, मज प्रिय साचा ।
वनवास तिच्या जरि वनिंचा
राज्य तर नकोच आहे पण वनवास सुध्दा तिच्याच वनातला हवा आहे. तुरूंगात घातलं तरी भारतातल्या तुरूंगात यांनी घालावं पण एखादे वेळेस हे इथेच कुठेतरी डांबून ठेवतील, ते नको आहे.
भुलविणे व्यर्थ हे आता । रे
बहु जिवलग गमते चित्ता । रे
तुज सरित्पते, जी सरिता । रे
हे सरित्पते, म्हणजे सरितांचा पती – इथलं काव्य पाहण्यासारखं आहे. सरिता (नद्या) सागराला स्वतःचं सगळं समर्पित करतात. तो त्यांचा पती. सरितेला सागराची ओढ असते तशीच सागरालाही सरितेची ओढ असते. सागराला म्हणत आहेत –माझं जिच्यावर प्रेम आहे त्या भारतामातेचा मला विरह घडवशील तर हे सागरा तुझं ज्यांच्यावर प्रेम आहे त्या सरितांचा तुला विरह होईल अशी मी तुला शपथ घालतो. नद्या तुझ्याकडे आल्याच नाहीत तर – मग प्राण तळमळणं म्हणजे काय असतं हे तुलाही कळेल.
तद्विरहाची शपथ घालितो तुजला ।
सागरा, प्राण तळमळला ।। ३ ।।
यानंतर आता शेवटचं कडवं आहे त्यात सावरकरांची आर्त आहे ; पण ती दीनवाणी नाही तर ती आक्रमक आर्त आहे. एखादा संकटात सापडलेला गलितगात्र सुटकेची भीक मागतो तसं हे मागणं नसून अवघड परिस्थितीतल्या सिंहाची डरकाळी आहे. सागराला सरितांच्या विरहाची शपथ घालून झाल्यावर ते सागराकडे पाहत आहेत तर त्याच्या लाटा तशाच उसळून फुटून फेसाळत आहेत. तो फेस पाहून त्या प्रकारे तो निर्दय सागर हसतो आहे असं त्यांना वाटलं. वीर पुरूषाने आव्हान दिल्यावर खलपुरूष असेच हसतात. असं वाटून ते म्हणतात-
या फेन-मिषे हससि निर्दया कैसा ।
का वचन भंगिसी ऐसा ?
माझ्या भारतमातेला तू जे वचन दिलं होतंस, की मी याला परत आणीन, ते भंग करून असा हसतोयस कसा ? हे गुलाम असतात ना, ते ज्यावेळेला मालकाच्या ताब्यात असतात तेव्हा आपण सुरक्षित आहोत म्हणून जगाकडे पाहून ते हसतात; पण ते गुलामीवृत्तीचं हीन प्रदर्शन असतं. तुझं हसणं हे असंच आहे. तुझ्यावर स्वामित्व गाजवणा-या आंग्लभूमीचा तू खरं तर गुलाम. तिला भिऊन राहणा-या सागरा,
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते ।
भिउनि का आंग्लभूमी ते ?
मन्मातेला अबल म्हणुनि फसविसी ।
मज विवासना ते देशी
विजनवास विदेशवास किंवा विवास – तू मला देतो आहेस पण अरे, आंग्लभूमीला भिणा-या भित्र्या खलपुरूषा, ऐक –
तरि आंम्लभूमी भयभीता । रे
अबला न माझिही माता । रे
माझी भारतभूमी ही अबला नाही आहे हे तुला एक दिवस कळेल. पूर्वीचा अगस्ति ऋषीचा प्रसंग तू विसरला आहेस.
कथिल हे अगस्तिस आता । रे
आमच्यातला एक अगस्ति पू्र्वी तुझ्यावर क्रुध्द होऊन एकाच आचमनात तुझं सगळं पाणी पिऊन बसला. तुझी कुठे नाव निशाणीही राहिली नाही. सर्वांनी प्रार्थना केली म्हणून त्याने तुला सोडलं. एवढा रूबाब काय करतोयस गुलामा, अगस्तीचा वारसा लाभलेले आम्ही तुला पुन्हा धडा शिकवू.
मातृभूमीला दुरावलेला आणि कायमचा दुरावला जाईल अशी शक्यता असलेला एक वीर पुरूष सागरावर रूसलेला आहे. वेदनेतून निर्माण झालेल्या ह्या अप्रतिम काव्यातून महापुरूषाचं मातृभूमीवरचं प्रेम आणि तिच्या भेटी आड येणा-या सागरावरचा रोष प्रकट झालाय. युवा केंद्राचं आगळेपण हे आहे की सागरावरचं हे तुफानी काव्य गात आहे सागरच !
Discuss Tell a friendBury
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!
Comments