http://www.loksatta.com/daily/20090729/mp02.htm


श्रीमंत पालकांच्या अरेरावीने मुंबईकर वेठीस
मुंबई, २८ जुलै / प्रतिनिधी


पेडर रोड येथील ‘न्यू एरा हायस्कूल’ ही शाळा व्यवस्थापनाने बंद करून ती फोर्ट येथे हलविण्याच्या प्रश्नावरून या शाळेतील पालक, विद्यार्थी व त्यांना सामील झालेल्या राजकीय संघटनांनी आज सकाळी साडेनऊच्या सुमारास अचानक ‘रास्ता रोको’ करून मुंबईकरांना विनाकारण वेठीस धरले. या श्रीमंत पालकांनी विद्यार्थ्यांना पुढे करून केलेल्या आंदोलनामुळे वाहतुकीचे तीनतेरा वाजलेच. पण रात्री उशिरापर्यंत मुंबईकरांना त्यांची कुठलीही चूक नसताना शिक्षा भोगावी लागली. अक्षरश: अरेरावी करीत सुमारे अकरा तास चाललेला हा रास्ता रोको पोलीसही थोपवू शकले नाहीत. अखेरीस आपल्याला जे पाहिजे ते पदरी पाडल्यानंतरच या श्रीमंत पालकांनी रात्री पावणेआठ वाजता रास्ता रोको मागे घेतला. परंतु या काळात मुंबईकरांना कमालीच्या हलाखीला आणि वाहतुकीच्या हाहाकाराला सामोरे जावे लागले.
या आंदोलनाला नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी आणि भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांनी पाठिंबा दिल्यामुळे उच्चभ्रू पालकांची ही अरेरावी अधिकच वाढली. या शाळेत जाणारी बहुसंख्य मुले ही अमराठी असतानाही मराठीचे व्रत घेतलेल्या मनसेने या आंदोलनाला पाठिंबा दिल्याबद्दल या आंदोलनामुळे अडकून पडलेले बसमधील तसेच टॅक्सीतील शेकडो मराठी प्रवासी संताप व्यक्त करीत होते. बिगर मराठी श्रीमंत मुलांचा पुळका ‘मनसे’ला का यावा, याबाबतही आश्चर्य व्यक्त केले जात होते. आंदोलनकर्त्यां पालकांना मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सकाळी साडेअकराच्या सुमारास चर्चेसाठी बोलाविले होते. या प्रकरणी दोन दिवसांत तोडगा काढला जाईल, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले. परंतु या आश्वासनाला न जुमानता पालकांनी आंदोलन सुरूच ठेवले. यानंतरही शिक्षण सचिव संजयकुमार, अतिरिक्त पोलिस आयुक्त हिमांशु रॉय यांनीही आंदोलकांना समजविण्याचा खूप प्रयत्न केला. तरीही आंदोलक ऐकत नव्हते. अखेरीस शाळा आहे त्याच ठिकाणी तातडीने सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी सायंकाळी उशिरा झालेल्या बैठकीत घेतल्यानंतर रात्री पावणेआठ वाजता रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. याबाबत मुख्यमंत्र्यांनी शाळेच्या इमारतीबाबत महापालिकेकडून अहवाल मागितला असून याबाबत आज सकाळी अकरा वाजता मुख्यमंत्र्यांकडे पुन्हा बैठक होणार आहे. मात्र पालकांनी उद्या पुन्हा त्याच मार्गाचा अवलंब करू नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात येईल, असे अतिरिक्त आयुक्त रॉय यांनी स्पष्ट केले.
पालक आणि विद्यार्थी रस्त्यावर बसून राहिल्याने सकाळी गर्दीच्या वेळी पेडर रोडच्या दिशेने आलेली वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. स्थानिक पोलिसांनी पालकांना समजवण्याचा प्रयत्न केला. परंतु हे श्रीमंत पालक कुणाचेही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. परंतु पालकांनी विद्यार्थ्यांची ढाल करून रास्ता रोको सुरूच ठेवला. पालकांची ही अरेरावी पोलीस फक्त पाहत राहिले. सुमारे हजारहून अधिक विद्यार्थी प्रत्यक्ष आंदोलनात सामील असल्यामुळे आम्हाला काहीही करता आले नाही, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. शाळा स्थलांतरित न करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही कुठलाही निर्णय घेतला जात नसल्याची ओरड पालक करीत होते. या आंदोलनामुळे वाहतुकीचा हाहाकार माजून अनेक चाकरमानी हाजीअली येथे अडकून पडले. तब्बल एक-दोन तास गाडय़ा एकाच जागी अडकून पडल्यानंतर पोलिसांनी वाहतूक वळविण्यास सुरूवात केली. मात्र सकाळची वेळ असल्यामुळे दक्षिण मुंबईकडे येणारा गाडय़ांचा लोंढा इतका प्रचंड होता की, सर्वत्र कमालीची कोंडी होऊन गाडय़ा एकाचजागी थांबल्या होत्या. या वाहतूक कोंडीनंतर माहिम कॉजवे येथे जाणारी बरीचशी वाहतूक सायनच्या दिशेने वळविण्यात आली तर काही वाहतूक सेनापती बापट मार्गावर वळविण्यात आली. मात्र वाहतूक पोलिसांच्या या अचानक पवित्र्यामुळे अक्षरश: गोंधळ उडाला. याचा परिणाम पश्चिम व पूर्व द्रुतगती मार्गावरही दिसू लागला होता. अनेक ठिकाणी वाहतूक वळविण्यात आली असली तरी त्याचा फारसा उपयोग झाला नाही. वाहतूक कोंडीत अडकून पडलेल्या अनेक प्रवाशांनी या श्रीमंत पालकांच्या अरेरावीला शिव्यांची लाखोली वाहिली.


Raj saheb yetya election madhe marathi che card chalnaar nahi ase vatate ki kai tumhala ki tumhalahi shrimant lokaancha pulka aalay?

Tin varshatach pakshachya policy badlayla laglaya?
Discuss   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links