अवघ्या महाराष्ट्रीयांच्या अस्मितेचे प्रतीक आणि युगानुयुगे या प्रदेशातील पर्यावरण संतुलन राखण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या सह्य़ाद्रीलाही आता मूठभर धनिकांनी वेठीस धरले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या सह्य़ाद्रीच्या साथीने स्थानिकांना स्वाभिमानाने जगता येईल, असे स्वराज्य निर्माण केले, त्या डोंगररांगा या स्वार्थी मूषकांच्या बिळांनी आता अक्षरश: भुसभुशीत झाल्या आहेत. पैशाच्या लालसेने सारा सह्य़ाद्रीच सध्या श्रीमंतांना आंदण दिल्यात जमा आहे.

शिवाजी महाराजांच्या पश्चात महाराष्ट्र जिंकण्याचे औरंगजेबाचे स्वप्न मराठय़ांनी ज्या पर्वताच्या साथीने धुळीस मिळविले, तो पर्वत आता हळूहळू श्रीमंतांच्या चैनीसाठी तुकडय़ा तुकडय़ाने गहाण ठेवला जात आहे. पैशाच्या जोरावर सारे काही विकत घेता येते, या मग्रुरीने बेधुंद झालेल्या परप्रांतीयांनी सह्य़ाद्रीला अक्षरश: बे‘सहारा’ करून टाकले असून, अशा प्रकारे महाराष्ट्राचे नाक कापले जात असूनही कोणताही राजकीय पक्ष, विचारवंत अथवा लेखक त्याबद्दल साधी खंतसुद्धा व्यक्त करताना दिसत नाहीत.

मुंबई-पुणे शहरांपासून साधारण अंबरनाथपासून ते लोणावळा-खंडाळ्यापर्यंतच्या जवळजवळ सर्वच गावांमध्ये मुंबईतील धनिकांनी जमिनी घेतल्या आहेत. त्यातील काही व्यवहार कायदेशीर असले, तरी बेकायदेशीर व्यवहारांची संख्या कितीतरी जास्त आहे. फार्महाऊस, विश्रांतिगृह, वीकएण्ड होम्स अशा स्वरूपाच्या वसाहतींनी सह्याद्रीची शांतता भंग पाऊ लागली आहे. काही वसाहतींच्या कुंपणांनी गड-किल्ल्यांच्या वाटाही बंद करून टाकल्या आहेत. या पट्टय़ातील जमिनीचे बहुतेक व्यवहार २५-३० वर्षांंपूर्वी झाले. त्यावेळी एकरी भावाने जागा विकत घेतल्या गेल्या. आता प्रति चौरस फूट दराने जमीन विकली जात आहे. येथील बंगल्यांच्या किमतींनी लाखांची वेस ओलांडून कोटींचा टप्पा गाठला आहे. कडेकोट पहाऱ्यातल्या या गर्भश्रीमंत वसाहतींमध्ये वीकएण्डला कोणते उद्योग चालतात हे मध्यंतरी उघडकीस आलेल्या रेव्हपार्टी प्रकरणातून उघड झाले आहे. नेमनियम धाब्यावर बसवून अथवा नियमात बसवून सह्याद्रीचा लिलाव करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांची कृष्णकृत्ये उघडकीस आणण्याबाबत कोणताही राजकीय पक्षनेता साधा ‘ब्र’सुद्धा उच्चारत नाही.
3 Comments   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links