राज ठाकरे यांना काँग्रेस-राष्ट्रवादीची पापं दिसत नाहीत. त्यांना शिवसेनेशिवाय दुसऱ्या कुणावर टीका करायची नसते. त्यामुळे त्यांनी केलेल्या आरोपांना गंभीरपणे घेण्याची आवश्यकता नाही’, असं सांगत शिवसेना कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘मराठी माणसाचा घात मनसेनेच केला’ अशी घणाघाती टीका लोकप्रभाला दिलेल्या खास मुलाखतीत केली. या खणखणीत मुलाखतीत उद्धव यांनी त्यांचा शिवसंवाद दौरा, शेतकऱ्यांच्या समस्या, काँग्रेस आघाडी सरकारचा कारभार, शिवसेनेची आंदोलनं अशा सर्वच विषयांवर आपली रोखठोक मतं व्यक्त केली. विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं अत्यंत संयमी उत्तर उद्धव यांनी दिलं. त्यातल्या प्रत्येक उत्तरातून त्यांचा समंजस, नम्र स्वभाव जसा उलगडत होता तसा त्यांचा आत्मविश्वासही जाणवत होता. अत्यंत संवादपूर्ण झालेली ही रोखठोक मुलाखत जशीच्या तशी..
कीर्तिकुमार शिंदे
सध्या तुमचा शिवसंवाद दौरा सुरू आहे. कसा प्रतिसाद मिळतोय त्याला?
तूफान. जबरदस्त. गावागावांतून शेकडो, हजारोंच्या संख्येने शेतकरी शिवसंवादमध्ये सहभागी होताहेत. अभूतपूर्व असा हा प्रतिसाद आहे. त्यांची दु:खं कुणी ऐकलेलीच नाहीत. त्यांच्यात अंसतोष, चीड, संताप खदखदतोय. पण तो व्यक्त करायला त्यांना कधी कुणी संधीच दिली नाही. मुर्दाड काँग्रेस सरकारकडे तर या गरीब शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळच नाही. या असंतोषाचा भडका उडाला ना तर.. अहो, ज्या महाराष्ट्राला विकसित राज्य समजलं जातं त्या राज्याच्या ग्रामीण भागात वीज, पाणी तर सोडाच पण शेतकऱ्यांना साधं खत-युरियाही मिळत नाहीये. काय दुर्दशा केलीय या राज्याची! उलट शेतकरी जर युरिया मागायला गेला तर हे निष्ठूर काँग्रेजी सरकार निर्लज्जपणे त्यांना खत संपलंय म्हणून सांगतं. शेतकऱ्याने जरा आग्रहच केला तर त्याच्यावर लाठीमारही करतं. म्हणजे ज्या शेतकऱ्याच्या श्रमांवर आपण जगतो त्यालाच हे लोक बडवतात. मराठवाडय़ात तर दुष्काळजन्य परिस्थिती आहे. ज्यांनी सोयाबीन, कापसाची पेरणी केलीय त्यांचं तर नशीबच फुटलंय म्हणाना. आता जर चांगला पाऊस वेळेवर पडला नाही तर शेतकऱ्यांची
पेरणी वाया जाईल. त्याची जबाबदारी कोण घेणार? शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे कृषी विम्याचे पैसेही मिळत नाहीत. कुणाकडे जायचं त्यांनी? त्यात राज्याचे कृषीमंत्री गायब! गेल्या पाच वर्षांत त्यांना कुणी बघितलंही नाहीये. कसे दिसतात ते, काळे की गोरे.. ते सुध्दा शेतकऱ्यांना माहीत नाही! या असल्या कृषीमंत्र्यांपेक्षा बुजगावणं बरं!
शेतीतून पुरेसं उत्पन्न होत नाही म्हणून शेतकरी कर्ज घेतो. त्यावरच्या चक्रव्याढ व्याजाने ही कर्जाची रक्कम नुसती फुगत जाते. मग यातूनच शेतकऱ्याच्या मनात आत्महत्येचा विचार येतो. आता या शेतकऱ्यांच्या कर्जाच्या वन टाईम सेटलमेंटसाठी प्रयत्न व्हायलाच हवेत.
शिवसंवाद दौऱ्याच्या निमित्ताने तुम्ही मराठवाडय़ात फिरलात. आता पुढे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातही जाणार आहात. काय चित्र दिसतंय तुम्हाला सध्या राज्याचं?
विद्रूप चित्र आहे सगळं. कसलाच ताळमेळ नाही. राज्याच्या प्रत्येक भागात प्रचंड अस्थिरता आहे. फक्त शेतकरीच नव्हे तर कामगार, महिला, तरुणांनाही आपला वाली कोण; हा प्रश्न सतावतोय. सरकारने आपल्याला उघडय़ावर टाकून दिल्याची भावना सर्वच समाजघटकांमध्ये दिसतेय. आणि यावर या सरकारचा तोडगा काय; तर पॅकेज! कोकणसाठी पॅकेज. उत्तर महाराष्ट्रासाठी पॅकेज. पण या पॅकेजच्या पैशांची तरतूद कशी करणार आहात? कामांची टेंडर कधी निघणार? सगळाच सावळागोंधळ. कुणाला कसला ताळमेळच नाही. शेतकऱ्यांच्या बाबतचा एक मुद्दा पुन्हा सांगतो, ज्यांची पहिली पेरणी वाया गेलीय त्यांना सरकारने नुकसान भरपाई देणं गरजेचं आहे. सरकारने जर त्यांच्या प्रश्नांकडे कानाडोळा केला तर हाहाकार माजेल..
समाजात तुम्हाला हा जो असंतोष, संताप जाणवतोय तो मतांतून म्हणजे शिवसेनेच्या बाजूने असल्याचं व्यक्त होईल?
(ठामपणे) हो. मला वाटतं यावेळी हा असंतोष मतपेटय़ांमध्ये उतरेल. परिस्थितीच तशी आहे. खरं तर, शिवसंवाद दौरा करताना जाहीर सभा घेणं हा माझा हेतूच नव्हता. मला फक्त महाराष्ट्राशी संवाद साधायचा होता. आणि हा संवाद साधताना प्रत्येक ठिकाणी मी तिथल्या सामान्य माणसाला, शेतकऱ्याला बोलतं करायचा प्रयत्न केला, करतोय. हे गावागावातले शेतकरीच आज हातात माईक घेऊन जाहीरपणे सांगताहेत की, काँग्रेस सरकारने आमची फसवणूक केली. यंदा आमचं मत शिवसेनेलाच!
दौऱ्याच्यामध्ये वाटेत मी अनेकदा शेताच्या कडेलाही थांबतो. तिथे पाच पन्नास शेतकऱ्यांशी बोलतो. त्यांच्या मनात काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा पुन्हा पुन्हा हेच जाणवलं की काँग्रेस आघाडी सरकारला राज्यातील जनता पुरती वैतागली आहे. आणि शिवसेनाच या काँग्रेजी सरकारला पर्याय ठरेल असं त्यांना वाटतं. शिवसेना हा शहरात जन्माला आलेला पक्ष आहे. भूमिपुत्रांच्या हक्कासाठी तो कायम लढला. त्यामुळेच असेल कदाचित पण शिवसेनेवर नेहमीच संकुचित, जातीय, धर्माधतेचा आरोप होत राहिला. पण आता ग्रामीण भागातही शिवसेनेचा मोठा प्रसार झालाय. आणि शेतकरी हा सुध्दा भूमिपुत्रच! पण काँग्रेस सरकार या भूमिपुत्राला विचारत नाही. या बेशरम सरकारमुळे आज ग्रामीण भागात उद्योगधंदे नाहीत. अनेक ठिकाणी एमआयडीसी ओस पडलेल्या आहेत. दुसरीकडे, पैशाशिवाय शिक्षण नाही. शिक्षण आहे तर नोकरीची हमी नाही. त्यामुळे शहरांबरोबरच ग्रामीण भागातील तरुणांना तर निराशेने ग्रासलेले आहे. एका निर्नायकी अवस्थेत ते जगताहेत.
अवघ्या महाराष्ट्रालाच कुणी नायक नाही!
पण उद्या तुम्ही जर महाराष्ट्राचे नायक झालात, शिवसेनेची सत्ता आली तर सर्वात आधी कुठल्या गोष्टी करण्याकडे लक्ष द्यल?
नाही, ते मी आता अजिबात सांगणार नाही. २००४चा म्हणजे गेल्या विधानसभा निवडणुकीचा अनुभव तुम्हाला सांगतो. त्यावेळी निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवरच मराठवाडय़ातल्या एका शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून आत्महत्या केली होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांना जेव्हा ही गोष्ट कळाली तेव्हा त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमुक्ती आणि वीजमाफीची घोषणाच केली. पण प्रत्यक्षात झालं काय? शिवसेनाप्रमुखांच्या या घोषणेनंतर तेव्हाच्या सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांना आकर्षित करण्यासाठी याच घोषणा दिल्या. त्यामुळे झालं काय की, शेतकऱ्यांनी पुन्हा सरकारच्याच पारडय़ात मतं टाकली. पण आता ही गोष्ट पुन्हा घडणार नाही. त्यामुळे आता आचारसंहितेची घोषणा झाल्यानंतरच शिवसेनेचा वचननामा जाहीर करण्यात येईल. त्या आधी यावर काहीच भाष्य करणार नाही.
तुम्हाला शेतीतलं काही कळत नाही, अशी टीका होत असते..
नाहीच कळत मला शेतीतलं काही! पण शेतकऱ्यांचं मन कळतं ना, ते पुरे आहे. आणि ज्यांना शेतीतलं कळतं त्या लोकांनी काय हो दिवे लावले? मला काही शेती करायची नाही. शेतकऱ्यांचं भलं करायचं आहे. त्यासाठी फक्त संवेदनशील मन हवं, आणि ते माझ्याकडे आहे. मला सांगा, एखादा मंत्री जेव्हा कोका कोलाच्या कारखान्याला भेट देतो तेव्हा त्याला कोका कोला कसा बनवतात ते माहीत असतं का? नाही ना! ह्या असल्या टीकेची मी पर्वा करत नाही. शेतकरीच ह्या लोकांचं तोंड फोडतील..
नुकतंच सरकारने २०००पर्यंतच्या झोपडय़ांना संरक्षण दिलंय. यामुळे चार लाख झोपडय़ांना अभय मिळेल..
माझं याबाबत थोडं वेगळं मत आहे. २०००पर्यंतच्या झोपडय़ांना कायम करण्याआधी सरकारी सेवकांना सरकारने हक्काचं घर द्यायला हवं. ज्या लोकांनी आयुष्यभर सरकारची सेवा केली त्या पोलिसांना किंवा कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर त्यांचे सरकारी घर सोडावे लागते. त्यामुळे घराची टांगती तलवार कायमच त्यांच्या डोक्यावर असते. त्यामुळे त्यांची सेवा संपल्यानंतर सरकारने या कर्मचाऱ्यांना त्यांच्या स्वतध्च्या हक्काचे घर द्यावे.
युतीच्या सत्ताकाळात १९९५पर्यंतच्या झोपडय़ांना कायम करण्याचा निर्णय मनोहर जोशींनी शिवसेनाप्रमुखांना अंधारात ठेवून घेतला, असा आरोप नुकताच राज ठाकरे यांनी केलाय..
ह्यांना शिवसेनेशिवाय दुसऱ्या कुणावर टीका करायची नसते. त्यामुळे ह्या लोकांनी केलेल्या आरोपांना गंभीरपणे घेण्याची आवश्यकता नाही.
बरं, पण गेल्याच आठवडय़ात शिवसेना आणि मराठी माणूस यांच्यातील नातं फोडण्यासाठी कुणालातरी सुपारी दिल्याचा आरोप तुम्ही केला होता.
एक गोष्ट विसरुन चालणार नाही की, हिंदुत्व आणि मराठी माणूस या एकीतूनच काँग्रेसचा पराभव घडलेला आहे. आणि ही गोष्ट काँग्रेसवाल्यांना चांगली माहितीये, त्यामुळेच मराठी मतं फोडण्यासाठी काँग्रेसने सुपारी दिलेली आहे.
तुमचा रोख मनसेकडे आहे का? तुम्ही राज ठाकरे किंवा मनसेवर जाहीर टीका का करत नाही?
काय बोलायचं ह्यांच्याबद्दल? ह्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीची पापं दिसत नाहीत. जळी स्थळी ह्यांना फक्त शिवसेनाच दिसते. शिवसेनेवर टीका करण्याशिवाय ह्या लोकांना काही उद्योगच नाही. खरं तर ह्यांचा बुरखा आता फाटलेला आहे. त्यांचं खरं रूप समोर आलंय. मराठी माणसाचा घात ह्यांनीच तर केला! पण मराठी माणसालाही आता खरं काय हे कळून चुकलंय. आज मुंबईतल्या मराठी माणसाला स्वत:च्या डोळ्यांदेखत स्वत:चा पराभव बघावा लागला, याला कोण जबाबदार आहे? काय साध्य झालं?
बेळगावचं उदाहरण बघून तरी प्रत्येकाने आता विचार करायला हवा. बेळगाव महापालिकेवरचा भगवा तिथल्या मराठी लोकांमध्ये फूट पडल्यामुळे उतरला. त्यामुळे मराठी एकजुटीला पर्याय नाही, हेच खरं. दुसरीकडे, आपलं मत फुकट गेलं ही भावनाही मराठीजनांमध्ये निर्माण झालीय. मुंबईतल्या मराठी माणसाने ज्यांना मत दिलं ते जिंकलेच नाहीत. उलट काँग्रेसचे उमेदवार निवडून आले. या सगळ्या गोष्टी मराठी मतदाराला कळत नाहीत का? कळतात. अगदी चांगल्या कळतात..
मराठी मतं फुटल्यामुळे निवडणुकीत मराठी माणसाचाच पराभव होतो हे कळलं म्हणूनच श्वेता परुळकर शिवसेनेत आल्या. बरं, त्या काही एकटय़ाच आलेल्या नाहीत. त्यांच्यासोबत इतर अनेक महिलाही शिवसेनेत येताहेत.
परुळकर, महाजन यांच्यानंतर आता मनसेचे आणखी काही पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी संपर्कात आहेत का?
त्यांचेच नाही तर सर्वच पक्षांमधून अनेक पदाधिकारी कार्यकर्ते शिवसेनेत येऊ इच्छिताहेत. विशेषकरुन तरुणांना शिवसेनेचं प्रचंड आकर्षण असल्यामुळे अनेक तरुण स्वत:हून शिवसेनेत येताहेत. याशिवाय, अनेक कलाकार कलावंतांना शिवसेनेच्या माध्यमातून काम करण्याची खूप इच्छा आहे. ते म्हणतात आम्हाला पक्षात यायचंय. पण मीच त्यांना म्हणतो, थांबा. घाई करू नका. तुमचं काम, करीअरही तितकंच महत्त्वाचं आहे.
हे खरंय की शिवेनेत अनेकजण येताहेत. त्यात अविनाश धर्माधिकारी, विक्रम बोके यांच्यासारखे माजी सनदी अधिकारी आहेत, तसा अभिजीत सावंतसारखा इंडियन आयडॉलही आहे. पण पक्षात येणाऱ्या या नव्या लोकांना तुम्ही नेमकी काय जबाबदारी देणार आहात?
खूप जबाबदाऱ्या आहेत. महाराष्ट्रासमोर समस्याच इतक्या प्रचंड आहेत की जितकी माणसं येतील तितकी कमीच पडतील. अविनाश धर्माधिकारींचं म्हणाल तर स्पर्धापरीक्षांसाठीचं जे शैक्षणिक मॉडेल त्यांनी उभारलंय ते एक उत्कृष्ट काम आहे. त्यांचा अभ्यास दांडगा आहे. शिवसेनेत प्रवेश केल्यापासूनच त्यांनी विद्यार्थ्यांना, तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी अनेक कार्यक्रम घेतले. त्यांना ऐकायला विद्यार्थी-पालकांची मोठी गर्दी होतेय. विक्रम बोकंेच्या प्रशासकीय अनुभवाचाही शिवसेनेला फायदाच होईल. अभिजीतही शिवसेनेच्या विविध कार्यक्रमांत सहभागी होतोय.
तुमची आंदोलनं जोरात सुरू आहेत, नवनवीन लोकंही पक्षात येताहेत. पण भाजपमध्ये मात्र फार काही हालचाल दिसत नाही. त्यांच्या निष्क्रियतेचा फटका युतीला बसेल, असं नाही वाटत?
खरंय. पण प्रत्येक राजकीय पक्षाची स्वतंत्र विचारसरणी असते. एक कार्यपध्दती असते. शिवसेना नेहमीच आक्रमक राहिली आहे. पण याचा अर्थ भाजप कमकुवत आहे, असा अजिबात होत नाही. निवडणुका लढण्याची आणि जिंकण्याची त्यांची स्वत:ची स्ट्रॅटेजी आहे. ते त्यांच्या स्ट्रॅटेजीनुसारच जाणार. मी माझ्या मार्गाने जाणार, ते त्यांच्या मार्गाने!
आता युतीचा विषय निघालाच आहे म्हणून विचारतो, उद्या जर मनसेने शिवसेना-भाजप युतीत येण्याची इच्छा व्यक्त केलीच तर तुम्ही काय भूमिका घ्याल?
ते कशाला येतील युतीत? अहो, ज्यांना फक्त शिवसेनाच गुन्हेगार वाटते त्यांच्याशी कसं काय जमू शकतं? ह्यांना काँग्रेसप्रेमाचं भरतं आलेलं आहे. त्यांच्याविषयी अधिक न बोललेलंच बरं..
रिलायन्स, बेस्ट, महागाईविरोधातील रस्त्यावरचं आंदोलन ते शिवसेना हेल्पलाईन/ कॉलसेंटर हा शिवसेनेचा केडर ते कॉपरेरेट प्रवास तुम्ही कसा केलात?
उगाचच बेंटकुळ्या दाखवणं मला आवडत नाही. मला वाटतं राजकीय नेत्याला त्याच्या शक्तीचा, ताकदीचा अंदाज असायला हवा. बदललेल्या काळाचं भानही हवंच. आजची शिवसेना ही अशीच सध्याच्या काळाचं भान असलेली २१व्या शतकातली शिवसेना आहे. तंत्रज्ञानामुळे जनसंपर्काची नवनवीन माध्यमं आज उपलब्ध झालेली असताना त्यांचा वापर लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी केलाच पाहीजे. त्यात गैर ते काय? शिवसेना हेल्पलाईन- कॉलसेंटर जनतेसाठीच तर आहेत. आज महाराष्ट्रातला कोणताही सर्वसामान्य माणूस त्याच्या माध्यमातून स्वत:ची समस्या सोडवू शकतो. किमान त्याला त्यामुळे भावनिक आधार मिळतोच. पण याचा अर्थ आम्ही रस्त्यावरची आंदोलनं सोडली आहेत असा अजिबात नाही. केडर आणि कॉपरेरेट पध्दतीचा संगम साधलाय आम्ही! कुणी नीट बोललेलं ऐकणार नसेल तर आम्ही रौद्र रूप धारण करतोच. त्यात कसलीही तडजोड नाही.
मुंबईतल्या बांगलादेशींच्या समस्येबद्दल शिवसेना नेहमीच बोलते, पण मग त्यांच्याविरोधात तुम्ही रस्त्यावर का नाही उतरत?
किती आणि कोणकोणत्या गोष्टींसाठी रस्त्यावर उतरायचं? महाराष्ट्राची सद्यस्थिती इतकी गंभीर आहे की प्रत्येक गोष्टीसाठी रस्त्यावर उतरायची वेळ आलीय. ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेचा निर्णय झाला तेव्हा शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांना आम्ही भेटून सांगितलं होतं की असं करू नका. पण त्यांनी ऐकलं नाही. आता त्या प्रवेशाचा कसा बोजवारा उडालाय ते आपण बघतच आहोत. त्याविरोधातही शिवसेनाच रस्त्यावर उतरली आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला. शेतकऱ्यांनी वीज मिळत नाही म्हणून शिवसेना रस्त्यावर उतरली आणि मुंबईसारख्या शहरात वीज मिळते पण सामान्यांना तिचा दर परवडत नाही म्हणूनही शिवसेनाच उतरली रस्त्यावर!
विधानसभा निवडणुकीत शिवसेना किती जागा जिंकेल; असा आपला अंदाज आहे.
खरं सांगू, मी जागांचा विचार करतच नाही. मला एकच गोष्ट माहिती आहे आणि ती म्हणजे या निवडणुकीत शिवसेनेची सत्ता आणायची आहे. बस्स. विधानसभेवर भगवा फडकवायचाय.
अनेकदा होतं काय; आपण अंदाज करत बसतो. की ही जागा आपण जिंकू, तिथे जिंकण्यासाठी अमुकतमुक करावं लागेल. वगैरे वगैरे. पण प्रत्यक्षात वेगळंच घडतं. जी जागा जिंकणं अपेक्षित असतं तिथे पराभव होतो, आणि जिथून काही अपेक्षा नसते तिथे जिंकतो. आता सांगा, अशा अंदाजपंचे गोष्टींवर विचार करण्यात वेळ कशाला घालवायचा?
एक गोष्ट मला स्पष्ट दिसतेय. राज्यात असंतोषाची लाट आहे. गेल्या महिन्यात नाही का समुद्रात शंभर वर्षांतली सर्वात मोठी लाट आली होती, अगदी तशीच. किंवा त्यापेक्षाही मोठीच. सर्वसामान्यांच्या मनातल्या असंतोषाची ही लाट सर्वानाच उद्ध्वस्त करेल. असंतोषाचं कोठार बनलेला हा महाराष्ट्र कधीही पेट घेऊ शकतो. त्यामुळेच आम आदमीचं डोकं फोडणारा हा काँग्रेसचा हात येत्या विधानसभा निवडणुकीत मूळासह उखडून फेकल्याशिवाय मी राहणार नाही.
शेवटचा प्रश्न. आदित्यला राजकारणात कधी उतरवणार?
मी राजकारणात यावं की नाही; किंवा कधी यावं; याबाबत शिवसेनाप्रमुखांनी मला कधी सांगितलं नाही. जबरदस्ती केली नाही. आदित्यबाबतही तेच. तो १८ वर्षांचा झालाय. वाचनाची त्याला आवड आहे. दररोजची वर्तमानपत्रं, राजकीय विषयांवरील पुस्तकं तो वाचत असतो. त्याची समजही चांगली आहे. त्याचा निर्णय त्यानेच घ्यायचाय. मी त्यात हस्तक्षेप करणार नाही.
Discuss Tell a friendBury
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!
Comments