आपापसात तंटा करण्यात आणि धन्याशी फितुरी करण्यात मराठ्यांचा हात कुणीही धरू शकत नाही... मराठ्यांमध्ये दुहीची बिजे रूजत नाहीत, तर फोफावतात... या औरंगजेबाच्या वाक्यांची आठवण करून देतानाच, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे म्हणजे मराठी मतांवर टपलेला भडभुंजा असल्याचा ठाकरी प्रहार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आज केला. उद्धवला काविळ झाल्याचा आरोप करणा-यांचीच पॅन्ट पिवळी झाली आहे... असा टोला बाळासाहेबांनी यावेळी राज यांचा स्पष्ट नामोल्लेख न करता लगावला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे व शिवसेनेचे कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात सुरू असलेल्या वाक् युद्धात अखेरचा घाव बाळासाहेबांनीच घातला.

विधानसभा निवडणूक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात शिवसेना-भाजपा युतीची संयुक्त जाहीर सभा आज सायंकाळी दादर येथील शिवाजी पार्कवर पार पडली. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह आणि शिवसेनेचे कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या जंगी सभेला शिवसेनाप्रमुख ठाकरे प्रत्यक्ष हजर राहू शकले नाहीत. परंतु अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ‘ मातोश्री ’ त बसलेल्या बाळासाहेबांनी शिवाजी पार्कवर जमलेल्या हजारो शिवसैनिकांशी टेलि-संवाद साधला. वाढत्या वयोमानामुळे यंदाच्या प्रचाराच्या रणधुमाळीत प्रत्यक्ष सहभागी होऊ न शकलेल्या बाळासाहेबांनीच अखेर यानिमित्ताने मनसे अध्यक्ष राज यांच्यावर तोफ डागत ‘ एक घाव, दोन तुकडे ’ केले.

जय महाराष्ट्र अशी परवलीची साद घालत बाळासाहेबांनी या टेलि-संवादाला प्रारंभ केला. मध्यंतरी हॉस्पिटलमध्ये माझ्या ज्या वा-या झाल्या, त्यामुळेच मी प्रत्यक्ष भेटीला येऊ शकलो नाही. परंतु २२ ऑक्टोबरच्या सेना-भाजप युतीच्या विजयी मेळाव्याला मी नक्का हजर राहीन, असा शब्द त्यांनी शिवसैनिकांना दिला. १३ तारखेला आपल्या आयुष्यात असलेले महत्त्व सांगून, यादिवशी चमत्कार घडवा. स्वाभिमानी मराठी म्हणून सगळे एकजुटीने उभे राहा. काय वाट्टेल ते करा, पण शिवसेनेचा भगवा महाराष्ट्राच्या विधानसभेवर डौलाने आणि दिमाखात फडकवा, असा आदेशच त्यांनी यावेळी दिला.

मराठी मतांवर टपलेला ' भडभुंजा '
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा नामोल्लेख टाळून बाळासाहेबांनी आज त्यांच्या ठाकरी भाषेत चांगलीच हजामत केली. काहींना आता मराठीचा पुळका आला आहे. अरे, शिवसेनेचा जन्मच झाला मुळी तो मराठी माणसासाठी. आणखी काय पाहिजे ? आमचं म्हणे मराठी माणसांवर प्रेम नाही, फक्त मराठी मतांवर डोळा आहे. मग तुझा डोळा कशावर आहे ? द्या ना उत्तर. सगळेच मतांचे लाचार झालेत. आता निवडणुका आल्यात म्हणून... नाहीतर आमचा मराठी दुसरीकडे जाऊच शकत नाही. उद्धवला काय तर म्हणे याची काविळ झालीय... हो झालीय. पण तुझी पॅन्टच पिवळी झालीय, त्याला उद्धव काय करणार ? तुला मागचं बघता येत नाही आणि पुढचं दिसत नाही. शिवसेनेने माठी माणसासाठी खस्ता खाल्ल्या, आंदोलनं केली. तुझं काय... आंदोलनाला कधी उतरलाच नाही, बायकांनाच पुढं पाठवलं. तुम्ही काय शिवसेनेसमोर गमजा मारताय ? पोलिसांचा घराचा प्रश्न सोडवू, म्हणून सांगतात. त्यांच्यासाठी टॉवर बांधू. अरे, टॉवर बांधणं हा तुमचा धंदाच आहे. बिल्डरचाच धंदा आहे ना तुझा... म्हणजे त्यातही पहिली कमाई याची... आपमतलबी, स्वार्थी... मराठी मतांवर टपलेल्या या भडभुजांनी हा असा प्रचार चालवला आहे... मराठी माणसाची एकजूट फोडण्याचे धंदे चालवलेत यांनी... अशा शब्दांत बाळासाहेबांनी राजला दे माय, धरणी ठाय करून टाकले.

दुहीची बिजे रूजू देऊ नका !
वसंत कानेटकर यांच्या नाटकातील औरंगजेबाची वाक्ये बाळासाहेबांनी यावेळी वाचून दाखवली. औरंगजेबाने मराठी माणसाचे जे वर्णन केले, ते राज ठाकरे यांना फिट्ट बसत असल्याचे बाळासाहेबांनी यानिमित्ताने स्पष्ट केले. मराठी माणूस भारी आहे, पराक्रमी आहे, गनिमी काव्यात हुशार आहे. परंतु फितुरीची बिजे मराठी मुलखात लवकर रूजतात, नुसतीच रूजत नाहीत, तर फोफावतात. आपापसात तंटा करणे, हा त्यांचा आणखी एक विशेष. धन्याशी फितुरी करण्यात यांना तोड नाही... धन्याशी फितुरी करण्यात... औरंगजेबाने तुमचे हे वर्णन करून ठेवलंय. थोडी बूज राखा... असा टोलाही ठाकरे यांनी राज यांना उद्देशून हाणला. यापुढे दुहीची बिजे शिवसेनेच्या खडकात रूजणार नाहीत. फेका फेका... काहीही उगवणार नाही. शिवसैनिकांच्या जिभाच आता भात्यासारख्या चमकतील आणि तुम्हाला पळता भुई थोडी होईल, अशी पुस्तीही ठाकरेंनी जोडली.

तेव्हा सरकारचे हात लुळे पडतात का ?
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारवरही बाळासाहेबांनी बसल्या जागेवरूनच दांडपट्टा चालवला. काय केलं यांनी दहा वर्षांत ? आता यांनाही मराठीचे कोंब फुटलेत. मराठी माणूस आमच्या हक्काचा आहे, इतरांचा आम्ही द्वेष करत नाही. परंतु मुंबई महाराष्ट्रापासून स्वतंत्र करण्याची हिंमत करू नका. नाही तर नरडीचा घोट घेतल्याशिवाय राहणार नाही, असे ठाकरेंनी ढाण्या वाघाच्या अविर्भावात सांगितले. औरंगजेब मेला, पण अफझलखानाच्या अवलादी अजून महाराष्ट्रात आहेत. अफझलखानाचा कोथळा बाहेर काढल्याची कमान लावली तर मिरजेत दंगल केली यांनी. दंगलखोरांवर रट्टा का बसला नाही ? आंदोलन करणा-या शेतक-यांची डोकी फोडण्यासाठी सरकारच्या लाठ्यांचा उपयोग होतो. दंगेखोरांवर कारवाई करताना तुम्हाला काय अर्धांग वायू होतो की हात लुळे पडतात... असले राज्यकर्ते बोडक्यावर बसवून घेणार आहात का तुम्ही ? असा खडा सवाल ठाकरे यांनी यानिमित्ताने महाराष्ट्रातील जनतेला केला. शेवटी ‘ जय हिंद, जय महाराष्ट्र ’ ची साद घालत त्यांनी शिवसैनिकांचा निरोप घेतला.


Sahebaancha vijay asoo,,,,

JAI HIND JAI MAHARASHTRA
Discuss   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links