गेल्या चाळीस वर्षांपेक्षा अधिक काळ मुंबईतील तमाम राजकीय पक्षांना आवाज कुणाचा.. म्हणत आवाज देणाऱ्या शिवसेनेचा आवाज या निवडणुकीत पार बसला. शिवसेनेचा घसा बसण्याचे प्रमुख कारण राज ठाकरे हे असले तरी उद्धव ठाकरे यांची साफ चुकलेली रणनीती, स्वतच्या आजुबाजूच्या चौकडीला अवास्तव महत्त्व देण्याची त्यांची पद्धत, ज्या कोकणाने शिवसेना रुजवली, वाढवली त्याऐवजी विदर्भात नको तितका वेळ देणे ही प्रमुख कारणे असल्याचे आता सामान्य शिवसैनिकांपासून ते शिवसेना नेत्यांपर्यंत अनेकजण आता बोलू लागले आहेत.
शिवसेना कार्याध्यक्ष हे पद उद्धव ठाकरे यांना मिळाल्यानंतर काही वर्षांतच त्यांच्याभोवती दोन राऊत आणि गोऱ्हे, नार्वेकर अशी चौकडी तयार झाली. पूर्वी बाळासाहेब ठाकरे यांच्यापर्यंत गल्लीतील सामान्य शिवसैनिक पोहोचून त्याचे गाऱ्हाणे मांडू शकत होता. बाळासाहेब एखाद्या कार्यकर्त्यांवर चिडले तरीही ते त्याचा तिरस्कार करत नसत. आता मात्र उद्धव यांच्यापर्यंत पोहोचायचे असल्यास आधी या चौकडीची मर्जी संपादन करणे क्रमप्राप्त झाले. त्यातही उद्धव ठाकरे एखाद्यावर नाराज झाल्यास, त्याला स्पष्ट बोलण्याऐवजी त्यांच्याशी ‘कट्टी फू’ करीत असल्याचे शिवसैनिकांचे म्हणणे होते. काल परवा संघटनेत आलेल्यांना स्वतच्या इतके जवळ ठेवल्याने जुने निष्ठावंत नाराज झाले होते.
त्यातच राज ठाकरे यांना लोकसभेत यश मिळाल्यामुळे बावरलेल्या सेना नेतृत्वाने मनसेतील कार्यकर्ते फोडून त्यांना सेनेत महत्त्वाची पदे देण्याचा सपाटा लावला. श्वेता परुळकर, संजय घाडी, प्रकाश महाजन, राजा चौगुले अशा कार्यकर्त्यांना उपनेतेपदासारखी महत्त्वाची पदे बहाल करण्यात आल्याने शिवसैनिक अचंबितच झाले. त्यातच राज ठाकरे यांनी उचललेला मराठीचा मुद्दा शिवसैनिक आणि शिवसेना समर्थक जनता यांना प्रचंड भावला. मुंबईमध्ये रोजगाराच्या शोधात आलेल्या उत्तर भारतीयांना मनसेने शत्रू क्रमांक एक म्हणून हल्ले सुरू केले. शिवसेनेने एकेकाळी दाक्षिणात्य व नंतर मुस्लिमांना असेच शत्रू म्हणून ‘प्रोजेक्ट’ केले होते. तीच रणनीती राज ठाकरे यांनी वापरली. याला प्रतिवाद करण्यासाठी वेगळे डावपेच उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कंपूला आखता आले नाहीत. त्याउलट सेनेच्या मूळ राडेबाज प्रकृतीच्या विरुद्ध आम्ही राडा संस्कृतीला नामशेष करू असा हितोपदेश शिवसेनेतून केला जाऊ लागला. प्रचाराच्या शेवटच्या शिवाजीपार्कवरील सभेत शिवसेनेचे खासदार भारतकुमार राऊत यांनी मंचावरून चक्क सानेगुरुजी यांची कविताच वाचून दाखविली. तार स्वरात आवाज कुणाचा.. म्हणत समोरच्याला आव्हान देणाऱ्या शिवसैनिकासाठी ही तर धक्कादायकच बाब होती. विदर्भातील शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी उद्धव ठाकरे प्रचंड मेहनत घेत असल्याचा प्रचार उद्धव यांच्या आजुबाजुच्या चौकडीने केला. त्याचे काही प्रमाणात कौतुक काँग्रेस-एनसीपीतील काही नेतेही खाजगीत करू लागले. त्यामुळे सेना नेते अधिकच गाफील झाले. मुंबई व कोकण या सेनेच्या बालेकिल्ल्याकडे त्यामुळेच दुर्लक्ष केले गेले. प्रत्यक्षात विदर्भात सेनेला केवळ आठच जागा मिळवता आल्या. तर मुंबईत केवळ चार, कोकणाने मात्र सेनेला साथ दिली. नाही तर मोठीच नामुष्कीची वेळ सेनेवर आली होती. गेल्या निवडणुकीपासूनच सेनेत पैसे घेऊन तिकीटे देण्याचा आरोप होत होता. असा आरोप या वेळी झाला नाही. पण आदेश बांदेकर यांच्यासारख्या सेनेशी काहीच संबंध नसलेल्या कलाकाराला सदा सरवणकर यांचे तिकीट कापून तिकीट देण्यात आले. ‘वहिनीसाहेब’ या टी.व्ही. मालिकेची आठवण यावी असाच हा प्रकार होता. बांदेकर यांच्यासाठी मोठी रॅली काढण्यात आली. मात्र हे भावजी तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. या सगळ्या गोष्टी आता शिवसैनिक आपापसात बोलू लागले आहेत. परळच्या नाक्यानाक्यावर ज्या भाषेत या सगळ्याच्या चर्चा सुरू आहेत, ती भाषा उद्धव यांना कधीच अवगत झालेली नाही आणि ती समजून घेण्याचा प्रयत्नही त्यांनी कधी केला नाही. सामान्य शिवसैनिक करीत असलेले हे विश्लेषण समजून घेतले, मान्य केले तर यातून पुढे मार्ग निघेल अन्यथा मुंबईच्या गल्लीतील शिवसैनिकांची दादागिरी आता मनसैनिकाच्या ताब्यात जाणार आणि हळूहळू ४४ जागा कमी कमी होत चापर्यंत येणार, अशी अत्यंत कडू प्रतिक्रिया एका ज्येष्ठ सेना पदाधिकाऱ्याने खंतावलेल्या स्वरात व्यक्त केली.
3 Comments   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links